लहानेंसह अन्य डाॅक्टरांचे राजीनामे सरकारडून मंजूर
* तात्काळ नवीन नियुक्ती करण्याचे आदेश मुंबई, ३ जून (हिं.स.) : जेजे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्स
JJ Hospital Dr. tatyarao Lahane


* तात्काळ नवीन नियुक्ती करण्याचे आदेश

मुंबई, ३ जून (हिं.स.) : जेजे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागातील मानद प्राध्यापक डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा आता राज्य सरकारने मंजूर केला आहे. त्या ठिकाणी तात्काळ नवीन नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी डॉ. तात्याराव लहाने यांची बदली करण्यासाठी निवासी डाॅक्टरांच्या वतीने आंदोलन केलं होतं. त्यानंतर लहाने यांनी आपला राजीनामा दिला होता. डॉ. लहाने यांच्यासोबत नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. तसेच इतर सर्वच डॉक्टरांचा राजीनामा सरकारने मंजूर केला आहे.

काय आहे पार्श्वभूमी

जेजे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून झालेल्या छळवणुकीविरोधात निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने संप पुकारला होता. याबाबत जेजे रुग्णालयातील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या २८ निवासी डॉक्टरांनी अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडे मार्ड संघटनेमार्फत तक्रार केली होती. त्याच्या आधारे डॉ. गजानन चव्हाण यांच्यासह अधिष्ठातांनी नेत्र विभाग प्रमुखांकडे स्पष्टीकरण मागितले. त्याच्या बरोबरीने डॉ. अशोक आनंद यांच्या अध्यक्षतेखील चौकशी समिती देखील नेमली. या अनुषंगाने चौकशी करत नेत्ररोग चिकित्सा विभागाने यावर स्पष्टीकरण दिले होते. मात्र त्यानेही समाधान झाले नसल्याने मार्डने संपाचा पवित्रा घेतला होता. महिला छळ प्रकरणी डॉ. रागिणी पारेख यांनी डॉ. अशोक आनंद यांची यापूर्वी चौकशी केली आहे. तसेच त्यांनी डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ. भंडारवार, डॉ. एकनाथ पवार, डॉ. अभीचंदानी यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सहा महिन्यांपूर्वी विभागात पदव्युत्तर अभ्यासक्राम शिकवण्यासाठी रुजू झालेल्या निवासी डॉक्टरांच्या तक्रारीवरून, आमचे म्हणणे न ऐकताच चौकशी सुरू ठेवण्यात आल्याचे सांगत डॉ. लहाने, डॉ. रागिणी पारेख यांच्यासह नऊ जणांनी राजीनामे दिले होते. यावरून मार्डने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना पत्रही लिहिले होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्विग्न होऊन डाॅ. लहाने, पारेख यांच्यासह ९ डॉक्टरांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. अखेर आता त्यांचे राजीनामे शासनाने मंजूर केले.

एकतर्फी अहवाल तयार करण्यात आला - डाॅ. लहाने

राजीनामा मंजूर झाल्यानंतर डॉ. तात्याराव लहाने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ३१ मे रोजी आपण राजीनामा दिला होता. आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर आमचं म्हणणं काय हेदेखील जाणून घेण्यात आलं नव्हतं. आमचं मत न घेता निवासी डॉक्टरांच्या आरोपांच्या आधारे एकतर्फी अहवाल तयार करण्यात आला होता. निवासी डॉक्टरांनी जे काही आरोप केले आहेत ते खोटे आहेत. त्यामुळे आम्ही आठ डॉक्टरांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. निवृत्त झाल्यानंतरही मला सेवा करण्याची संधी मिळाली याबद्दल मी आभार व्यक्त करतो. राजीनामा दिल्यानंतर आपली कोणत्याही राजकीय नेत्याशी किंवा सरकारमधील व्यक्तीशी चर्चा झाली नव्हती, असेही डॉ. लहाने यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande