रशिया, युक्रेनने युध्द थांबवावे, जगाला युध्दाची नाही तर बुध्दाची गरज - रामदास आठवले
बँकॉक/मुंबई, 3 जून (हिं.स.) - जगात जिथे अतिरेकी कारवाया होत आहेत,तिथे हिंसाचार घडतो आहे. हे थांबले प
रशिया, युक्रेनने युध्द थांबवावे, जगाला युध्दाची नाही तर बुध्दाची गरज - रामदास आठवले


बँकॉक/मुंबई, 3 जून (हिं.स.) - जगात जिथे अतिरेकी कारवाया होत आहेत,तिथे हिंसाचार घडतो आहे. हे थांबले पाहिजे. रशिया आणि युक्रेनचे हिंसक होत चाललेले युध्द थांबले पाहिजे. युध्दाने जगाचे नुकसानच होत आहे. जगाच्या कल्याणासाठी तथागत गौतम बुध्दांनी सांगितलेली अहिंसा, शांती या विचारांची गरज आहे. जगाला युध्दाची नव्हे तर तथागत बुध्दांनी सांगितलेल्या विचारांची गरज आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

थायलंड मधील बँकॉक येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनोच्या) कार्यालयात जागतिक वेसाक महोत्सव या नावाने बुध्द पोर्णिमा आणि धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 2 दिवसांच्या हा धम्म परिषदेच्या सांगता समारंभात ना. रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणुन बोलत होते. भारत सरकारचे केंद्रीय राज्यमंत्री आणि बौध्द नेते म्हणून त्यांना या परिषदेत आपले विचार मांडण्याची संधी देण्यात आली. त्यावेळी जगाला बुध्दांच्या शांती, अहिंसा, सत्य, समता या विचारांची गरज असल्याचे आपले मत मांडले.

त्यावेळी भारतातुन भारतीय बौध्द महासभेचे भिमराव आंबेडकर, युनायटेड बुध्दीस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, गगन मलीक, नितीन गजभिये, भिमराव सावतकर, सिध्दार्थ हत्तीआंबीरे असे अनेक मान्यवर उपस्थित होते. या परिषदेला भारतातुन 100 हुन अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधीसत्व महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौध्द धम्माची दिक्षा घेवुन धम्मक्रांती केली. सम्राट अशोकानंतर भारतात सर्वात मोठे धम्मचक्र प्रवर्तन महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्याच दिवशी लाखो अनुयायांनी डाँ. बाबासाहेबांच्या हस्ते बौध्द धम्माची दीक्षा घेतली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या या धम्मक्रांतीमुळे भारतात बौध्द धम्माचे पुनर्जीवन झाले. बौध्द धम्मात स्वातंत्र्य,समता, बंधुत्व, प्रज्ञा, शिल, करुणा, शांतता, अहिंसा या तत्वांची शिकवण दिली आहे. बौध्द धम्म हा आदर्श जीवन मार्ग आहे. बौध्द धम्मानेच भारताचे तसेच सर्व जगाचे कल्याण होणार आहे. या विचारानेच डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली. त्याचा आम्हाला अभिमान आहे असे यावेळी रामदास आठवले म्हणाले

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande