अहमदनगर, 23 सप्टेंबर, (हिं.स.):- अहमदनगर शहरातील फुटबॉल खेळाडू तनिषा बळीराम शिरसुल हिची वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या फुटबॉल निवड चाचणीद्वारे महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड झाली आहे. शिरसुल ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तनिषा शिरसुल ही गुलमोहर स्पोर्ट्स क्लबची खेळाडू आहे.यापूर्वी झालेल्या विविध फुटबॉल स्पर्धेत तिने उत्कृष्ट कामगिरी करुन आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आहे.ती सुभाष कनोजीया व प्रसाद पाटोळे या प्रशिक्ष कांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. या यशाबद्दल खेळाडू शिरसुल व तिच्या पालकांचे अहमदनगर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया,शिवाजीयन्सचे अध्यक्ष तथा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोज वाळवेकर,खालीद सय्यद,रिशपालसिंह परमार,सहसचिव रौनप फर्नांडिस,गोपी परदेशी,महिला सदस्या पल्लवी सैंदाणे,गुलमोहर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष जोहेब खान यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
हिंदुस्थान समाचार