रत्नागिरी, 25 सप्टेंबर, (हिं. स.) : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सामानाची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गेल्या १२ जून रोजी १५ हजार ४९९ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच राजापूर पोलीस ठाण्यात ३० जून रोजी एका प्रवाशाचा २० हजाराचा माल चोरीस गेला होता. त्याची तक्रारी दाखल झाली होती. हे दोन्ही गुन्हे रेल्वे प्रवासादरम्यान घडले होते. त्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी जिल्ह्यातील रेल्वे प्रवासादरम्यान घडलेल्या चोरीच्या सर्व गुन्ह्यांचा आढावा घेतला आणि सर्व गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकामार्फत तपास सुरू करण्यात आला आणि तांत्रिक तसेच गोपनीय माहितीच्या आधारे दोन्ही गुन्ह्यांतील आरोपीचा शोध घेण्यात आला. दिनेश कुमार ओमप्रकाश (वय २७, छर्पिया, पोस्ट महुवार, रुर्धेली खुर्द, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) याला २४ सप्टेंबर रोजी मडगाव (गोवा) येथे अटक करण्यात आली. आरोपीने दोन्ही गुन्हे आपण स्वतः केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून ३९ हजार २०० रुपये किंमतीचे ४ मोबाइल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही गुन्ह्यांतील सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत रेल्वे प्रवासा दरम्याने चोरीच्या गुन्ह्यांमधील आतापर्यंत एकूण ६६ हजार ६९९ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी दिनेश कुमार ओमप्रकाश याने रेल्वे प्रवासा दरम्यान आणखी चोरीचे गुन्हे केले आहेत का, याचा अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अमोल गोरे, हवालदार विजय आंबेकर, सागर साळवी, योगेश नार्वेकर, पोलीस नाईक दत्तात्रय कांबळे आणि कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांच्या पथकाने केली. दरम्यान, प्रवाशांनी रेल्वे प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तू जपून ठेवण्याची योग्य खबरदारी घ्यावी आणि चोरीचे गुन्हे आपल्या आजूबाजूला घडत असतील तर तात्काळ ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार