विधानसभेच्या दुसऱ्या यादीत 39 उमेदवारांचा समावेश
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर (हिं.स.) : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज, सोमवारी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 39 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या यादीत भाजपने 3 केंद्रीय मंत्र्यांना तिकीट दिले आहे. त्यात मुरैना येथील दिमानी मतदारसंघातून नरेंद्रसिंग तोमर, नरसिंगपूरमधून प्रल्हाद पटेल आणि निवासमधून फग्गनसिंग कुलस्ते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपनेही आपल्या 4 खासदारांना विधानसभा निवडणुकीत उतरवले आहे. जबलपूर पश्चिम मतदारसंघातून राकेश सिंग, सतनामधून गणेश सिंग, सिधीमधून रीती पाठक आणि गदरवारामधून उदय प्रताप सिंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना इंदूर विधानसभा क्रमांक 1 मधून तिकीट देण्यात आले आहे. विवेक बंटी साहू यांना छिंदवाडामधून उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी भाजपने पहिल्या यादीत 39 उमेदवारांची नावे जाहीर केली होती.
पक्षाच्या दुसऱ्या यादीनुसार राज्यातील सतना जिल्ह्यातील मैहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार नारायण त्रिपाठी यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे. भाजपने येथून श्रीकांत चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली आहे. नारायण त्रिपाठी यांनी काही दिवसांपूर्वीच स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. मात्र, त्यांनी अद्याप अधिकृतपणे भाजपपासून फारकत घेतली नव्हती. सिद्धी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार केदारनाथ शुक्ला यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे. त्यांच्या जागी सिधीच्या खासदार रीती पाठक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सिधी येथील लघवीच्या घटनेनंतर काँग्रेसने भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांच्यावर हल्लाबोल केला होता.
हिंदुस्थान समाचार