पाकिस्तान : इम्रान खान यांना 10 वर्षाची शिक्षा
गोपनीय कायद्याच्या उल्लंघनाचे प्रकरण इस्लामाबाद, 30 जानेवारी (हिं.स.) : पाकिस्तानच्या विशेष न्यायाला
इम्रान खान


गोपनीय कायद्याच्या उल्लंघनाचे प्रकरण

इस्लामाबाद, 30 जानेवारी (हिं.स.) : पाकिस्तानच्या विशेष न्यायालायाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. इम्रान यांनी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात ऑफिशिअल सिक्रेट ऍक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आलीय. पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अबुल हसनत मोहम्मद जुल्कारनैन यांनी आज, मंगळवारी हा आदेश दिला. इम्रान खान यांचे वकील शोएब शाहीन यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली.

इम्रान यांच्या बरोबरच पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावरही गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूतांनी सरकारला पाठवलेल्या गोपनीय संदेशातील मजकूर इम्रान खान यांनी शेअर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाने विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देण्याचे ठरवले आहे. हे प्रकरण बनावट असल्याचा पीटीआयचा आरोप आहे.

इम्रान खान यांना झालेल्या शिक्षेनंतर पीटीआयकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत वक्तव्यात म्हंटले आहे की, देश वाचवण्यासाठी आणि आमच्या स्वातंत्र्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या इम्रान खान व शाह मेहमूद कुरेशी यांच्या पाठीशी संपूर्ण पाकिस्तान उभा आहे. कुठलाही खोटा खटला मार्च-एप्रिल 2022 रोजी जे घडले ते बदलू शकत नाही. आमचा कॅप्टन आणि व्हाइस कॅप्टन लवकरच परत येईल. उच्च न्यायालयात हा निर्णय अजिबात टिकणार नाही, असा विश्वास पीटीआयने व्यक्त केला आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande