महाराष्ट्रात तब्बल ३० वर्षांनी विक्रमी मतदानाची नोंद ...!
* मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा ३.७ टक्के मतदान वाढले * कागल येथे सर्वाधिक ८२ टक्के, कल्याण पश्चिममध्ये सर्वांत कमी ४१ टक्के * प्रमुख शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मुंबई, २१ नोव्हेंबर (हिं.स.) : विधानसभा निवडणुकीत राज्यात सरासर
मतदान


* मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा ३.७ टक्के मतदान वाढले

* कागल येथे सर्वाधिक ८२ टक्के, कल्याण पश्चिममध्ये सर्वांत कमी ४१ टक्के

* प्रमुख शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद

मुंबई, २१ नोव्हेंबर (हिं.स.) : विधानसभा निवडणुकीत राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. अखेरच्या काही तासांत मतदानाने जोर पकडल्याचे चित्र राज्याच्या काही भागांत पाहायला मिळाले. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढल्याचे चित्र आहे. विशेष बाब म्हणजे मागील ३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. १९९५ साली ७१.६९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. ही मतदानाची वाढलेली आकडेवारी निवडणुकीच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार मोठ्या शहरांमध्ये मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले होते. मात्र त्याला फारसे यश आले नसल्याचे पाहायला मिळाले. या चार सुशिक्षित आणि तुलनात्मक उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या शहरी भागांमध्ये काहीसा निरुत्साह कायम असल्याचे दिसले. मात्र उर्वरित गावखेड्यांमधील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत चांगला प्रतिसाद दिला. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील काही केंद्रांवर रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान चालू होते. त्यामुळे मतदानाची जिल्हानिहाय अंतिम आकडेवारी येण्यास विलंब झाला. रात्री ११.४५ वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ६५.११ टक्के मतदान झाले आहे. राज्यात सर्वाधिक ७६.२५ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले. त्यातही कागल मतदारसंघात तब्बल ८२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तेथे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) समरजितसिंह घाटगे यांच्यातच चुरशीची लढत होत आहे. दुसरीकडे सर्वांत कमी ४१ टक्के मतदान हे कल्याण पश्चिम मतदारसंघात झालं आहे. मंत्रालय व विधानभवन ही सत्तेची प्रमुख केंद्रे असलेल्या कुलाबा मतदारसंघांत टक्केवारी वाढवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले असले तरी तिथे ४५ टक्केच मतदान झाले आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये राज्यात कधीच ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झालं नव्हतं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१.३९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झालं होतं. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा ३.७ टक्के मतदान वाढलं आहे.

मागील सहा विधानसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी पाहिल्यास २०१९ मध्ये ६१.४४ टक्के, २०१४ मध्ये ६३.३८ टक्के, २००९ मध्ये ५९.६८ टक्के, २००४ मध्ये ६३.४४ टक्के, १९९९ मध्ये ६०.९५ टक्के आणि १९९५ मध्ये ७१.६९ टक्के मतदान झाले होते.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी

अहमदनगर – ७१.७३ टक्के,

अकोला – ६४.९८ टक्के,

अमरावती – ६५.५७ टक्के,

औरंगाबाद- ६८.८९ टक्के,

बीड – ६७.७९ टक्के,

भंडारा – ६९.४२ टक्के,

बुलढाणा – ७०.३२ टक्के,

चंद्रपूर- ७१.२७ टक्के,

धुळे – ६४.७० टक्के,

गडचिरोली – ७३.६८ टक्के,

गोंदिया – ६९.५३ टक्के,

हिंगोली – ७१.१० टक्के,

जळगाव – ६४.४२ टक्के,

जालना – ७२.३० टक्के,

कोल्हापूर – ७६.२५ टक्के,

लातूर – ६६.९२ टक्के,

मुंबई शहर- ५२.०७ टक्के,

मुंबई उपनगर - ५५.७७ टक्के,

नागपूर – ६०.४९ टक्के,

नांदेड – ६४.९२ टक्के,

नंदुरबार- ६९.१५ टक्के,

नाशिक – ६७.५७ टक्के,

उस्मानाबाद – ६४.२७ टक्के,

पालघर – ६५.९५ टक्के,

परभणी – ७०.३८ टक्के,

पुणे – ६१.०५ टक्के,

रायगड – ६७.२३ टक्के,

रत्नागिरी – ६४.५५ टक्के,

सांगली – ७१.८९ टक्के,

सातारा – ७१.७१ टक्के,

सिंधुदुर्ग – ६८.४० टक्के,

सोलापूर – ६७.३६ टक्के,

ठाणे – ५६.०५ टक्के,

वर्धा – ६८.३० टक्के,

वाशिम – ६६.०१ टक्के,

यवतमाळ – ६९.०२ टक्के

मतदान झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande