पुणे, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।
महाविकास आघाडीच्या विजयाच्या दाव्याचा फुगा फोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणूकीत बारामती आपलीच असल्याचे महाराष्ट्राला दाखवून दिले. लोकसभा निवडणूकीत पराभवाचे शल्य पुसून गेल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी बारामती शहर व ग्रामीण भागात प्रचंड जल्लोश केला.
याआगोदर अजित पवार यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार युगेंद्र पवार काठावर का होईना विजयी होतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने केला होता. परंतु बारामतीच्या जनताजनार्दनाने मतांच्या रुपाने विकास कामांना प्राधान्य दिले आणि अजित पवार यांच्यावरच पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला. हे आशादायक चित्र मतमोजणी प्रक्रियेतून स्पष्ट होताच बारामतीकर पुर्णतः समाधानी झाल्याचे दिसून आले.
महाराष्ट्रात मतमोजणीच्या दिवशी महायुतीने विधान सभा निवडणूकीत मुसंडी मारल्याचा आनंद एका बाजूला बारामतीकर घेत होते, तर दुसऱ्याबाजूला हेच बारामतीकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घड्याळ चिन्हाला किती मताधिक्याने मिळते, यावरच चर्चा करीत होते.दुपारी एक वाजता पन्नास हजारांपेक्षा अधिक मतांनी अजित पवार यांनी आघाडी घेतली आणि शहर व ग्रामीण भागात एकच जल्लोश सुरू झाला. फटाक्यांची आतषबाजी झाली. यावेळी एकच वादा...अजित दादा, महाराष्ट्राचा एकच दादा...अजित दादा अजितदादा, अशा अनेक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु