नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक निकालाबरोबरच देशातील 14 राज्यांच्या 48 मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीचे निकाल देखील आज, शनिवारी जाहीर झाले. यामध्ये सर्वाधिक 20 विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. काँग्रेसला 7 तर तृणमूल काँग्रेसचा 6 मतदारसंघात विजय झाला आहे.
देशातील 14 राज्यांमधील 48 मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक झाली. त्यांपैकी उत्तरप्रदेशात विधानसभेच्या 9 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला 6, लोकदल-1 आणि समाजवादी पक्षाला 2 जागा मिळाल्या आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वच्या सर्व 6 जागांवर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. राजस्थानच्या 7 पैकी 5 जागांवर भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. तर भारत आदिवासी पक्षाला 1 आणि काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे. आसाममध्ये 5 पैकी 3 भाजप, युनीयटेड पीपल्स पक्ष (लिबरल) 1 जागा आणि आसाम गण परिषद 1 जागेवर विजय झाला. पंजाबमधील 4 पैकी 3 जागांवर आम आदमी पक्ष आणि 1 जागेवर काँग्रेसचा विजय झाला आहे. बिहारमध्ये 4 पैकी 2 भाजप, 1 हिंदुस्तानी अवामी मोर्चा , जनता दल (संयुक्त) 1 जागा मिळाली आहे. तर कर्नाटकच्या 3 जागांवर काँग्रेसला यश मिळाले आहे. मध्य प्रदेशातील 2 पैकी 1 काँग्रेस आणि 1 भाजप, केरळच्या 2 पैकी काँग्रेसला 1 आणि माकप 1, विजय मिळाला आहे. तर उत्तराखंड, छत्तीसगढ, गुजरात या राज्यांतील प्रत्येकी 1 जागेवर निवडणूक झाली. या तिन्ही राज्यांत भाजपचा विजय झाला आहे. सिक्कीमच्या 2 जागांवर सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाच्या उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला आहे. तर मेघालयची 1जागा नॅशनल पीपल्स पक्षाला मिळाली आहे.
--------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी