पुणे, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी ९० हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवत पक्षाचा दबदबा कायम ठेवला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे ॲड. किशोर शिंदे यांच्यासोबत लढत होत असतानाही पाटील यांनी मतदारसंघात ९०,७६९ मतांचे प्रचंड मताधिक्य घेत भाजपच्या बालेकिल्ल्यास साजेसा विजय मिळवला आहे.
पुण्यातील ८ पैकी ६ विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपामध्ये भाजपच्या वाट्यास आले होते. या सर्व ६ जागांवर भाजपने दमदार विजय मिळवला आहे. कोथरुडमधून चंद्रकांत पाटील, कसबा पेठेत हेमंत रासने, पर्वतीत माधुरी मिसाळ, खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात सुनील कांबळे आणि शिवाजीनगर येथे सिद्धार्थ शिरोळे यांनी विजय मिळवत पुण्यात भाजपचे वर्चस्व कायम ठेवले आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु