* बारामतीतून अजित पवार विजयी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत !
* चंद्रकांत पाटील, इचलकरंजीतून राहुल आवाडे, शिवेंद्रराजे भोसले, राजेश क्षीरसागर विजयी !
पुणे, 23 नोव्हेंबर (हिं.स.) - पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये महायुतीने वर्चस्व राखले आहे. यात मुख्य विजयी उमेदवारांमध्ये कोथरूड येथून भाजपचे चंद्रकांत पाटील, सातारा येथून भाजपचे शिवेंद्रराजे भोसले, सांगली येथून भाजपचे सुधीर गाडगीळ यांचा समावेश आहे. कोल्हापूर शहर उत्तर मतदारसंघात हिंदुत्वाच्या सूत्रावर शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी गतवेळी पराभूत होऊन यंदा लक्षणीय विजय नोंदवला. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड मतदार संघात भाजपचे डॉ. अतुल भोसले यांनी पराभव केला.
१० पैकी ९ जागा जिंकून भाजप महायुतीचा कोल्हापूर जिल्ह्यात मोठा विजय !
७६ टक्के असे सर्वाधिक मतदान झालेल्या कोल्हापूर जिल्ह्याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर १० पैकी ९ जागा जिंकून महायुतीने जिल्ह्यात वर्चस्व कायम ठेवले आहे. कोल्हापूर शहर मतदार संघात शिवसेनेचे राजेश क्षीरसागर, करवीर मतदारसंघातून शिवसेनेचे चंद्रदीप नरके आणि शिवसेनेचे प्रकाश आबीटकर तिसर्यांदा विजयी झाले आहेत. राजेक्ष क्षीरसागर हे सातत्याने हिंदुत्वाच्या सूत्रावर प्रखर भूमिका मांडतात आणि त्यामुळे त्यांनी मिळवलेला विजय हा लक्षणीय आहे. कोल्हापूर शहर उत्तर मतदारसंघात भाजपचे अमल महाडिक (१७२०० मतांनी विजयी), इचलकरंजी येथून भाजपचे राहुल आवाडे, जयसिंगपूर येथून अपक्ष आणि भाजपचा पाठिंबा असलेले डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर (२८ हजार मताधिक्य) यांनी दुसर्यांदा, शाहूवाडी येथून जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे, हातकणंगले मतदार संघात भाजपचा पाठिंबा असलेले डॉ. अशोक माने (४६३९७ मतांचे मताधिक्य) विजयी झाले. कागल येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आणि चंदगड येथून अपक्ष शिवाजी पाटील विजयी झाले आहेत. जिल्ह्यात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे वर्चस्व पूर्णपणे मोडून काढण्यास भाजप यशस्वी झाला असून जिल्ह्यात काँग्रेसचा एकही उमेदवार जिंकून आलेला नाही.
आमचं ठरलंय ‘सुप्रियाताई लोकसभेला आणि विधानसभेला दादा’ हे बारामतीकरांनी सिद्ध केले. बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार (८८४८६ मताधिक्य) यांना बहुमताने विजयी केले. संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण लढत होती. यात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात वर्चस्व सिद्ध करणारी निवडणूक होती.
पुणे जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेस १० जागांवर आणि भाजप ९ जागांवर विजयी !
पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस १० जागांवर, भाजप ९ जागांवर, १ जागावर अपक्ष, तर जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. पुणेकरांचे लक्ष लागून राहिलेल्या कसब्यातून भाजपचे हेमंत रासने, शिवाजीनगरमधून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे, कोथरुडमधून दुसर्यांदा भाजपचे चंद्रकांत पाटील (१ लाख ५ सहस्र ५४० मताधिक्य) पुणे कॉन्टोन्मेंटतून भाजपचे सुनील कांबळे यांनी विजय खेचून आणला. खडकवासलातून सलग ४ वेळा भाजपचे आमदार भीमराव तापकीर, पर्वतीतून तिसर्यांदा भाजपच्या माधुरी मिसाळ, वडगावशेरीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनिल टिंगरे, हडपसरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चेतन तुपे आपली जागा राखली. भोर येथे राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर विजयी झाले. इंदापूरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे यांनी तिसर्यांदा विजय मिळवत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. पुरंदरातून मैत्रीपूर्ण लढतीमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे, मावळातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके विजयी, खेड-आळंदीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबाजी काळे, जुन्नरमधून अपक्ष सिद्धार्थ सोनवणे, शिरूर राष्ट्रवादीच्या माऊली कटके, दौंडमधून भाजपचे राहुल कुल, पिंपरीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे, चिंचवडमधून भाजपचे शंकर जगताप यांनी विजयी परंपरा राखली, तर भोसरीतून भाजपचे महेश लांडगे हे दुसर्यांदा निवडून आले.
सोलापूर जिल्ह्यात ११ पैकी ५ जागांवर भाजप विजयी !
सोलापूर जिल्ह्यात महायुतीला संमिश्र यश मिळाले असून ११ पैकी ५ जागांवर भाजप विजयी झाले आहेत. शहरात उत्तर मतदार संघात भाजपचे विजयकुमार देशमुख सलग पाचव्यांदा, तर दक्षिण मतदार संघात भाजपचे सुभाष देशमुख हे सलग तिसर्यांदा विजयी झाले आहेत. सोलापूर शहरात मध्य मतदारसंघात नवीन चेहरा असलेले भाजपचे तरुण उमेदवार देवेंद्र कोठे यांनी एमआयएमचे शाब्दी यांचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. पंढरपूर मतदार संघात विद्यमान आमदार समाधान आवताडे, माळसिरस येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तम जानकर आणि अक्कलकोट येथून सचिन कल्याणशेट्टी दुसर्यांदा विजयी झाले आहेत. सांगोला येथून ‘पीझंट अॅण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया’चे डॉ. बाबासाहेब देशमुख, बार्शी येथून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप सोपल, तर माहोळ येथून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राजू खरे विजयी झाले आहेत.
सातारा जिल्ह्यात ८ पैकी ६ ठिकाणी महायुतीचा विजय !
सातारा जिल्ह्यात ८ पैकी ४ जागांवर भाजप, २ जागांवर शिवसेना आणि २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. सातारा शहर येथून भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सलग सहाव्यांदा विजयी झालेले आहेत. वाई येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मकरंद पाटील आणि फलटण येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील विजयी झाले आहेत. शिवसेनेचे शंभूराज देसाई हे तिसर्यांदा आणि कोरेगाव येथून शिवसेनेचे महेश शिंदे विजयी झाले आहेत. माण-खटाव येथून भाजचे जयकुमार गोरे विजयी झाले. कराड येथे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे सहा वेळा आमदार असलेले बाळासाहेब पाटील यांना भाजपचे मनोज घोरपडे यांनी पराभूत केले. राज्यात सर्वात लक्षवेधी असणार्या लढतीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपचे डॉ. अतुल भोसले (३८३६६ मतांनी) यांनी पराभव केला.
सांगली जिल्ह्यात ५ जागांवर भाजप, २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, तर एका जागेवर शिवसेना विजयी !
सांगली जिल्ह्यात ५ जागांवर भाजप, २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार, तर एका जागेवर शिवसेना विजयी झाली आहे. यात सांगलीतून भाजपचे सुधीर गाडगीळ तिसर्यांदा, मिरज येथून डॉ. सुरेश खाडे हे चौथ्यांदा, शिराळा मतदार संघात भाजपचे सत्यजित देशमुख, तर जत येथून गोपीचंद पडळकर विजयी झाले आहेत. तासगाव येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आणि तत्कालीन गृहमंत्री आर.आर. आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, तसेच ईश्वरपूर येथून जयंत पाटील विजयी झाले आहेत. विटा येथून सुहास बाबर हे शिवसेनेच्या तिकीटावर पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. जिल्ह्यात काँग्रसची पलूस-कडेगाव मतदार संघात विश्वजीत कदम यांच्या रूपाने केवळ एकमेव जागा निवडून आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर