नांदेड, २३ नोव्हेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीप्रमाणेच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण विरुद्ध भाजपकडून डॉ. संतुक हंबार्डे मैदानात होते. त्यात 4,25,574 मते घेत डॉ. संतुक हंबार्डे यांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांना 3,90,149 मते मिळाली. परिणामी चव्हाण यांचा पराभव झाला. या विजयामुळे लोकसभेतील भाजपची एक जागा वाढली आहे.
नांदेड लोकसभा मतदार संघात एप्रिल-मे महिन्यांत झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे वसंत चव्हाण विजयी झाले होते. परंतु निकालानंतर दोन महिन्यांत वसंत चव्हाण यांचे निधन झाले होते. त्यामुळे नांदेडमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांचा भाजपच्या डॉ. संतुक हंबार्डे यांनी 35,425 मताधिक्याने पराभव केला.
एप्रिल-मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभात प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत होती. त्या वसंत चव्हाण 59442 मतांनी विजयी झाले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा भाजपच्या खात्यात होती. त्यावेळी प्रतापराव गोविंदराव चिखलीकर खासदार झाले होते. नांदेड लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत विधानसभेच्या 6 जागा आहेत. या जागेवर 1952 मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळी काँग्रेसचे शंकरराव तेलकीकर विजयी झाले होते. त्यानंतर 1957 च्या निवडणुकीत काँग्रेसने देवराव कांबळे विजयी झाले होते. 1962 मध्ये काँग्रेसचे तुळशीदास जाधव विजयी झाले. 1967 च्या निवडणुकीत काँग्रेसने येथून उमेदवार बदलून व्यंकटराव तिरोडकर विजयीही झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव