अशोक चव्हाणांचा काॅंग्रेसला रामराम, आमदारकीचाही दिला राजीनामा
मुंबई, 12 फेब्रुवारी (हिं.स.) - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक
Ashok Chavan


मुंबई, 12 फेब्रुवारी (हिं.स.) - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. या संदर्भातील पत्रे अनुक्रमे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सादर केली आहेत. आता आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांची पुढील राजकीय वाटचाली काय असणार याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

     आगामी काही महिन्यांत लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पटोले हे काँग्रेस हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब करणारं एक पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. या पत्रात चव्हाण यांच्या नावापुढे माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख आहे. त्या आधीच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सोमवारी सकाळी ११ वाजून २४ मिनिटांनी चव्हाण यांनी आपला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला आणि तो त्यांनी स्वीकारला.

    चव्हाण यांनी स्वत: समाजमाध्यमांद्वारे या घडामोडींची माहिती दिली. चव्हाण यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, आज सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे. तसेच त्यांनी वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर असलेल्या त्यांच्या प्रोफाईलवरील काँग्रेससंबंधीची सर्व माहिती हटवली आहे.

वडील आणि मुलगा मुख्यमंत्री असण्याचं महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण 
 
    अशोक चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र. शंकरराव प्रशासनात 'मुख्याध्यापक' म्हणून ओळखले जात. त्यांचा प्रशासनात दरारा होता. त्यांचे सुपुत्र म्हणून त्यांचा राजकीय वारसा अशोक चव्हाणांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला. वडील आणि मुलगा मुख्यमंत्री असण्याचं महाराष्ट्रातलं हे एकमेव उदाहरण आहे.
राजकीय कारकीर्द
 
    २८ ऑक्टोबर १९५८ रोजी अशोक चव्हाणांचा मुंबईत जन्म झाला. बीएससी आणि एमबीए अशी भक्कम शैक्षणिक कारकीर्द त्यांच्या पाठिशी आहे. १९८५ मध्ये संजय गांधी निराधार योजनेचे नांदेड शहराचे चेअरमन म्हणून त्यांनी राजकारणातील कारकिर्दीला सुरुवात केली. शंकरराव चव्हाण १९८० साली पहिल्यांदा नांदेडचे खासदार झाले. त्याआधी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९८७ मध्ये जेव्हा शंकरराव मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांची खासदारपदाची रिक्त जागा अशोक चव्हाणांनी भरून काढली. प्रकाश आंबेडकरांचा त्यांनी या निवडणुकीत मोठा पराभव केला. त्यावेळी त्यांचं वय फक्त ३० होतं. १९८७ ते १९८९ या काळात खासदारपदाचा अनुभव घेतल्यावर त्यांनी पक्ष कार्यात भाग घ्यायला सुरुवात केली. १९८६-१९९५ या काळात ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये अशोक चव्हाणांना फार महत्त्वाची पदं भूषवता आली नाही. १९९९ मध्ये ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द कायम चढत्या क्रमानं झाली.
मुख्यमंत्रीपद आणि राजीनामा
     शरद पवार आणि त्यानंतर विलासरावांच्या काळात विविध मंत्रिपदं भूषवल्यानंतर २००८ मध्ये त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी मिळाली. २६/११ च्या हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. तेव्हा काँग्रेसवासी असलेले नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा होती. मात्र आमदारपदाची कारकीर्द आणि निष्ठावंतात होणारी गणती या गोष्टी पाहता अशोक चव्हाणांची मुख्यमंत्रीपदावर निवड झाली. तेव्हा २००९ च्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या. या निवडणुकीतही त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली.
 
    सगळं काही आलबेल असतानाच २००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी 'अशोक पर्व' नावाच्या पुरवणीसाठी पेड न्यूज देऊन त्याचा खर्च निवडणूक खर्चात न दाखवल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. त्याचप्रमाणे कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याप्रकरणी घोटाळ्यात त्यांच नाव आलं आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं.
     २०१४ ला मोदी लाटेत केवळ दोनच खासदार काँग्रेसमधून लोकसभेत गेले होते. त्यातील एक हिंगोलीचे राजीव सातव आणि दुसरे नांदेडचे अशोक चव्हाण. पण २०१९ मध्ये त्यांना आपली जागा राखता आली नव्हती. कट्टर प्रतिस्पर्धी प्रतापराव चिखलीकर यांनी त्यांचा पराभव केला होता. भाजपच्या तिकिटावरून चिखलीकरांनी अशोक चव्हाणांना हरवलं होतं. 

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande