मराठा समाजाला ओबीसी व्यतिरिक्त कुठलेही स्वतंत्र आरक्षण देता येणार नाही - हरीभाऊ राठोड
मुंबई, 12 फेब्रुवारी (हिं.स.) - मराठा समाजाला ओबीसी व्यतिरिक्त कुठलेही स्वतंत्र आरक्षण देता येणार ना
हरीभाऊ राठोड


मुंबई, 12 फेब्रुवारी (हिं.स.) - मराठा समाजाला ओबीसी व्यतिरिक्त कुठलेही स्वतंत्र आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे त्या संदर्भातील कायदा करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट मत माजी खासदार ओबीसी नेते हरीभाऊ राठोड यांनी व्यक्त केले आहे.

मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा समाज इतर मागासवर्गांसाठी असलेली पात्रता पूर्ण करेल, म्हणजेच ते ओबीसी ठरतील हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही घेता येईल. बांटिया आयोगाचा अहवाल आणि सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाप्रमाणे ओबीसीचे आरक्षण वाढवणे शक्य आहे. मराठा समाज एकदाचा ओबीसी ठरल्यानंतर त्यांच्यासाठी सगे-सोयरे शोधण्याची आवश्यकता नाही आणि त्यांच्यासाठी कायदाही करण्याची आवश्यकता नाही, असेही राठोड म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक २५९/१९९४ या प्रकरणात दिलेल्या निर्देशनानुसार, बांटीया आयोगाच्या आणि मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार मिळालेला इम्प्रिकल डाटाच्या आधारे आरक्षणाची मर्यादा वाढवणे शक्य आहे, तसेच मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करून घेणे शक्य आहे. भारतरत्न कर्पूरि ठाकूर यांच्या फाॅर्म्युल्याप्रमाणेही राज्यात आरक्षण देणे शक्य आहे. मराठा आरक्षण राज्यातील अत्यंत संवेदनशील असा विषय आहे, मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात जर टिकले नाही; तर शासनाकडून घोर फसवणूक होईल, हे सिद्ध होईल. त्यामुळे शासनाने वारंवार चुका करू नये हाच आमचा प्रामाणिकपणे शासनाला संविधानिक सल्ला असल्याचेही राठोड म्हणाले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande