नवी मुंबईत 'स्वच्छ चित्रकला स्पर्धा' आणि 'किल्ला स्पर्धा' यामधील विजेत्यांचा सन्मान
नवी मुंबई, 12 फेब्रुवारी (हिं.स.) : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने विविध उ
स्वच्छ चित्रकला स्पर्धा 


नवी मुंबई, 12 फेब्रुवारी (हिं.स.) : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने विविध उल्लेखनीय उपक्रम राबवले असून यामध्ये लोकसहभागावर विशेष भर दिलेला आहे. त्यामुळे स्वच्छ शहराचे देशात द्वितीय क्रमांकाचे मानांकन नवी मुंबईला लाभले आहे.

'इंडियन स्वच्छता लीग' अंतर्गत राबविलेल्या 3 अभिनव उपक्रमांची 'बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स' मध्ये विक्रमी नोंद झालेली आहे. यामधील एक विशेष उल्लेखनीय उपक्रम म्हणजे संपूर्ण नवी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या स्वच्छता विषयक संकल्पनांना मुक्त वाव देणारी 'स्वच्छ चित्रकला स्पर्धा'. या उपक्रमास इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की 200 हून अधिक शाळांमधील पहिली ते दहावीच्या वर्गातील 2 लाख 83 हजार 144 मुले यामध्ये सहभागी झाली. या सहभागी प्रचंड विद्यार्थी संख्येची नोंद 'बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स'मध्ये घेण्यात आली.

या स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते महापालिका मुख्यालयातील 'संकल्प स्वच्छतेचा' या कार्यक्रमात गौरविण्यात आले.

इयत्तेनुसार 3 गटांमध्ये घेण्यात आलेल्या या स्वच्छ चित्रकला स्पर्धेमध्ये सर्व गटातून सर्वोत्तम चित्रकार म्हणून नमुंमपा शाळा क्रमांक 15, शिरवणे येथील विद्यार्थी विवेक विलास संगा आणि विद्याभवन हायस्कुल, नेरूळ येथील विद्यार्थी साई नेताजी शिंदे यांना लॅपटॉप देऊन सन्मानीत करण्यात आले. विशेष म्हणजे हे लॅपटॉप रि-टेक या संस्थेमार्फत विविध संगणकीय भाग कौशल्यपूर्णरित्या एकत्रित करून तयार करण्यात आले आहेत. या संस्थेचे संचालक पंकज तिरमनवार यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

त्याचप्रमाणे इयत्ता पहिली ते चौथीच्या गटात फादर अॅग्नेल मल्टीपर्पज स्कूल, वाशी येथील विद्यार्थिनी सान्वी सुरेश सुतार हिने प्रथम क्रमांक पटकाविला तसेच नमुंमपा शाळा क्रमांक 91, दिवा येथील विद्यार्थी प्रथम प्रसाद साटम याने द्वितीय व तेरणा विद्यालय नेरूळ येथील विद्यार्थी तनुष नरेंद्र मेजोर यांनी तृतीय क्रमांक संपादन केला.

इयत्ता पाचवी ते आठवीच्या गटात डीएव्ही पब्लिक स्कूल, नेरूळ येथील विद्यार्थिनी प्राजक्ता सरकार प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली, तसेच रॉयल ख्रिश्चन स्कुल, वाशी येथील विद्यार्थी स्वराज्य स्वपन जाना याने द्वितीय क्रमांक व पोदार इंटरनॅशनल स्कूल, नेरूळ येथील विद्यार्थी अमेय निळकंठ बोरसे याने तृतीय क्रमांक पटकाविला.

इयत्ता नववी व दहावीच्या गटात विद्याभवन हायस्कूल, नेरूळ येथील विद्यार्थी अंकित अमेय धारा याने प्रथम क्रमांकाचे तसेच शिरवणे विद्यालय, नेरूळ येथील विद्यार्थी मंथन शाम भोईर याने द्वितीय आणि न्यू बॉम्बे सिटी स्कूल, नेरूळ येथील तनिष्क सुभाष सुळे या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संपादन केले.

दीपावली उत्सव कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'किल्ला स्पर्धा' यामध्ये सेक्टर 8, नेरूळ येथील त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये वैभव निकारे आणि सहकाऱ्यांनी बनवलेल्या किल्ल्याला प्रथम क्रमांकाचे व सेक्टर 8, नेरूळ येथील गुरुकृपा सोसायटीमध्ये तनिष रवींद्र शिर्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बनवलेल्या किल्ल्याला द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे सध्याच्या सोशल मिडीयाप्रेमी डिजिटल युगात सदर किल्ले स्पर्धेचे गुणांकन सोशल मीडियावर किल्ल्याची छायाचित्रे अपलोड करून त्यावर मिळालेल्या लाईक्सची मोजणी करून देण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांकाच्या किल्ल्यास 1058 आणि द्वितीय क्रमांकाच्या किल्ल्यास 716 लाईक्स प्राप्त झाले होते.

या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालक व शिक्षकांनीही आवर्जून उपस्थिती दर्शवली होती.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande