तुमची विकृती ही कधीच कलाकृती होऊ शकत नाही
मुळात आपण अन्न ग्रहण करतो, मग ते अन्न पचतं आणि मल म्हणजेच विष्ठा बाहेर पडते. कारण शरीराची प्रणाली वि
तुमची विकृती ही कधीच कलाकृती होऊ शकत नाही


मुळात आपण अन्न ग्रहण करतो, मग ते अन्न पचतं आणि मल म्हणजेच विष्ठा बाहेर पडते. कारण शरीराची प्रणाली विशिष्ट पद्धतीने काम करत असते. कोणती गोष्ट आत घ्यायची आणि कोणती गोष्ट बाहेर टाकायची याचं ज्ञान आपल्या शरीराला असतं. जे बाहेर टाकलं जातं, ते आपण अन्न म्हणून खाऊ शकत नाही. हा साधा, सरळ, सोपा नियम आहे. मात्र समाजात असे अनेक घटक असतात जे हा नियम मोडण्यासाठी प्रयत्न करत असतात. कारण अन्न आणि मल ह्यातला फरक त्यांना कळत नसतो. अशा लोकांना तुम्ही काय म्हणाल? विकृत!

सावित्रीबाई फुले विद्यापीठात ललित कला केंद्राने सादर केलेल्या नाटकाच्या व्हिडिओची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. हे नाटक सुरु असताना अभाविपच्या विद्यार्थ्यांनी ते थांबवलं. या व्हिडिओमध्ये स्पष्ट कळून येतंय की त्यांनी प्रभू श्रीराम आणि माता सीतेचा भयंकर अपमान केलेला आहे. आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारत हा असा देश आहे आणि हिंदू हा असा धर्म आहे जो प्रत्येकाला सत्यशोधन करण्याचा अधिकार देतो, प्रत्येकाला त्याच्या बुद्धीनुसार ईश्वराचा शोध घेण्याची अनुमती देतो, प्रत्येकाला ईश्वर आणि उपासनापद्धती निवडण्याची मोकळीक देतो.

काही दिवसांपूर्वी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी रामायणावर टीका केली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की अनेक रामायण उपलब्ध आहेत, मग खरं रामायण कोणतं मानाव? यावर एका वृत्तवाहिनीने प्रश्न विचारला असता दिग्गज कलाकार अभिराम भडकमकर म्हणाले, ही तर अभिमानाची गोष्ट आहे. एकीकडे एकच धर्मग्रंथ मानला जात असताना आणि त्याला न मानणार्याला मृत्यूदंड दिला जात असताना दुसरीकडे रामायणासारख्या धर्मग्रंथाच्या अनेक आवृत्त्या आहेत. ही मोकळीक हिंदूंमध्ये आहे, याचा अभिमान व्यक्त करायला हवा. पण नेमाडेंसारखे मोठे साहित्यिक खेद का व्यक्त करतात, हे मला कळत नाही.

जगात असेही धर्म आणि देश आहेत, जिथे ईशनिंदेला मृत्यूदंड दिला जातो. तिथे, त्यांच्याकडे साधा प्रश्न विचारायलादेखील अनुमती नाही. धर्मग्रंथावर, ईश्वरावर टीका करायची नाही, असे त्यांचे स्पष्ट मत आहे आणि टीका केलीत तर ईश्वराच्याच आदेशानुसार तुमचा अंत केला जाईल. अशी त्यांची पद्धत आहे. भारतात मात्र तुम्ही प्रश्न विचारु शकता. म्हणूनच सिंधुताई सपकाळ देखील आपल्या भाषाणात सहज म्हणून जातात मला राम आवडत नाही, मला कृष्ण आवडतो. आणि तरीही आपण त्यांना अनाथांची माय म्हणतो. सिंधुताईंकडे पाहताना आपण ’आई’ म्हणून पाहतो. आपण त्यांच्यात सीता शोधण्याचा प्रयत्न करतो. हे आपलं वेगळेपण आहे.

भारतात बाबराने पाडलेलं राम मंदिर पुन्हा निर्माण व्हायला ५०० वर्षे लागली. भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे उलटून गेली, त्यानंतर हा हक्क त्यांना मिळाला. हिंदू इतके सहनशील आहेत, त्यांच्यात वत्सलता आहे आणि अशा सहनशील हिंदूंना अतिरेकी म्हणण्याचा घाट कॉंग्रेसने घातला होता. मात्र सहनशीलता, वत्सलता या शब्दाचा अर्थ नेभळट असा होत नाही. सावित्रीबाई विद्यापीठात जो प्रकार घडला तो विकृतीचा कळस होता. माता सीतेची वेशभूषा धारण केलेला बाप्या सिगरेट ओढतो आणि आई-बहिणींवरुन शिव्या घालतो. ज्या सीतेला हिंदू आई म्हणतात आणि ज्या श्रीरामाला हिंदू प्रभू म्हणतात, ज्यांची ते दिवसरात्र पूजा करतात, अशा ईश्वराची अश्लाघ्य कृतीतून टिंगल-टवाळी करणार्या विकृतीला हिंदूंनी कलाकृती म्हणायचं? आणि हा विकृत प्रकार घडू द्यायचा, ह्यालाच जर अभिरुची म्हणायची, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचे तर तुमच्या मानवी भावना मृत झाल्या आहेत, आणि तुम्ही मानवतेची मर्यादा ओलांडून दानवतेच्या समीप पोहोचला आहात.

कला हा सुंदर शब्द आहे, कला ही सुंदर अभिव्यक्ती आहे. या कलेने अनेकांना निखळ आनंद दिला आहे, कुणाच्या भावनांना स्पर्श करत त्यांच्या डोळ्यांतून अश्रू तरळले आहेत, कुणाला मनसोक्त हसवले आहे तर कुणाच्या मनावर प्रेमाची फुंकरदेखील मारली आहे. कलेने एकात्मतेची भावना निर्माण केली आहे, स्वातंत्र्याची गरज आणि स्वातंत्र्याचा अर्थ समजावून सांगितला आहे. या कलेचा वापर प्रचारकी हेतूसाठीही करता येईल. तसा अनेकांनी केलाही आहे. मात्र अन्न आणि विष्ठा ह्यातला फरक तुम्हाला माहित असायला हवा. कलाकृती आणि विकृती ह्यातला भेद तुम्हाला कळायला हवा. नाहीतर आमचं भारतीय संविधान तुम्हाला या गोष्टीची आठवण नक्कीच करुन देण्यास समर्थ आहे.

लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande