चिलीत आगीचे रौद्ररूप : ११२ बळी, १६०० बेघर, २०० बेपत्ता
चिली, ५ फेब्रुवारी (हिं.स.) : दक्षिण अमेरिकेतील चिलीमध्ये दाट लोकवस्ती नजीकच्या जंगलात आग पसरली. आगी
चिली आग 


चिली, ५ फेब्रुवारी (हिं.स.) : दक्षिण अमेरिकेतील चिलीमध्ये दाट लोकवस्ती नजीकच्या जंगलात आग पसरली. आगीने रौद्ररूप धारण केले असून अद्यापही ती धुमसतच आहे. या आगीत तब्बल ११२ लोकांचा मृत्यू, १६०० लोक बेघर, २०० लोक बेपत्ता झाले आहेत. दरम्यान प्रशासनाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

सुमारे १० लाख लोकसंख्या असलेल्या मध्य चिलीच्या वालपरिसो प्रदेशातील अनेक भाग शनिवारी धुराच्या लोटाने व्यापले होते. प्रशासनाने हजारो लोकांना घरे रिकामी करण्याचे आवाहन केले आहे.

चिलीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विना डेल मार या किनारपट्टीवरील पर्यटन शहराच्या आसपासचे भाग प्रभावित झाले आहेत. सर्व बाधित भागात पोहोचण्यासाठी बचाव पथके मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत.

२०१० च्या भूकंपानंतर सर्वांत मोठी आपत्ती - चिली गृहमंत्री

आगीबाबत माहिती देताना चिलीचे गृहमंत्री कॅरोलिना तोहा म्हणाले की, वालपरिसोमधील परिस्थिती सर्वांत गंभीर आहे. रस्त्यांवरही जळालेल्या अवस्थेत लोकांचे मृतदेह सापडत आहेत. २०१० च्या भूकंपानंतर चिलीमधील ही सर्वांत मोठी आपत्ती आहे. त्यावेळी भूकंपामुळे सुमारे ५०० लोकांचा मृत्यू झाला होता.

आग ४३ हजार हेक्टरवर पसरली - चिली अध्यक्ष

चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी सांगितले की, परिस्थिती सध्या खूपच कठीण आहे. सध्या ही आग ४३ हजार हेक्टरवर पसरली आहे. सध्या आम्ही लोकांना वाचवण्याचे प्रयत्न करतोय, आतापर्यंत अनेकांना आगीच्या विळख्यातून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

तब्बल ९२ जंगलात आग

एका अहवालानुसार, चिलीच्या ९२ जंगलात आग लागली आहे. सर्वांत मोठी चिंतेची बाब म्हणजे ही आग दाट लोकवस्तीच्या भागात पसरत आहे. त्यामुळे लोक, घरे आणि सुविधांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. चिलीमध्ये उन्हाळ्यात जंगलात आग लागणे सामान्य आहे. गेल्या वर्षी विक्रमी उष्णतेच्या वेळी लागलेल्या आगीत २७ लोकांचा मृत्यू झाला होता.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande