डोपिंग प्रकरणात फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू पॉल पोग्बावर चार वर्षे बंदी
पॅरिस, १ मार्च (हिं.स.) : डोपिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू पॉल पोग्बावर चा
पॉल पोग्बा


पॅरिस, १ मार्च (हिं.स.) : डोपिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू पॉल पोग्बावर चार वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इटलीच्या डोपिंग विरोधी एजन्सीला सप्टेंबर २०२३ मध्ये डोपिंग चाचणीत पोग्बा पॉझिटिव्ह आढळला होता. चौकशी दरम्यान तो स्वत:ला निर्दोष सिद्ध करू शकला नाही. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पोग्बा फुटबॉल क्लब जुव्हेंटससाठी मिडफिल्डर म्हणूनही खेळतो.

२०१८ मध्ये झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्स संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फुटबॉल विश्वातील बड्या खेळाडूंमध्ये पॉल पोग्बा याची गणना केली जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, पोग्बाच्या डोपिंग चाचणीत त्याच्यामध्ये सहनशक्ती वाढवणारे हार्मोन्स जास्त असल्याचे आढळून आले. त्याची पहिली चाचणी ऑगस्ट २०२३ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये दुसऱ्यांदा सॅम्पल घेण्यात आले आणि त्यामध्येही तो पॉझिटिव्ह आढळला. पोग्बावर ही बंदी तेव्हापासून लागू होणार आहे जेव्हा तो पहिल्यांदा पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूवर ऑगस्ट २०२७ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. पोग्बा सध्या ३० वर्षांचा आहे आणि बंदी संपल्यावर तो ३४ वर्षांचा असेल. त्यामुळे पुन्हा फुटबॉलच्या मैदानावर परतणे त्याच्यासाठी सोपे काम होणार नाही.

पॉल पोग्बा दुखापतीमुळे २०२२ मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्स संघाचा भाग होऊ शकला नाही. त्याचवेळी, २०२३ मध्ये गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे तो फार कमी सामन्यांमध्ये खेळताना दिसला. २०२२ मध्ये पोग्बाला इंग्लिश क्लब मँचेस्टर युनायटेडकडून फ्री ट्रान्सफर केल्यानंतर, तो इटालियन क्लब जुव्हेंटसचा भाग बनला. पोग्बाने आतापर्यंत ९१ आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळले असून मिडफिल्डर असूनही त्याच्या नावावर ११ गोल आहेत.

डोप काय म्हणतात?

खेळाडू शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी जी बंदी असलेली औषधे घेतात त्यांना डोप म्हणतात. ही औषधे इंजेक्शन, तोंडी किंवा द्रव स्वरूपात घेतली जाऊ शकतात. हे एक प्रकारे अप्रामाणिक आहे, कारण अशी औषधे घेतल्यानंतर खेळाडूची क्षमता आणि कामगिरी इतर खेळाडूंपेक्षा खूपच चांगली होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande