पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शेहबाज शरीफ यांची निवड
* सोमवारी शपथविधी इस्लामाबाद, ३ मार्च (हिं.स.) : पाकिस्तानमध्ये पंतप्रधानपदासाठी झालेल्या निवडणुकीत
शेहबाज शरीफ 


* सोमवारी शपथविधी

इस्लामाबाद, ३ मार्च (हिं.स.) : पाकिस्तानमध्ये पंतप्रधानपदासाठी झालेल्या निवडणुकीत शेहबाज शरीफ यांची (३ मार्च) सरशी झाली आहे. संसदेत मतदानावेळी गदाराेळ झाला. शरीफ यांना २०१ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी इम्रान खान यांच्या 'पीटीआय' पक्षाचे उमर अयुब खान यांना अवघी ९२ मते मिळाली. शेहबाज शरीफ सलग दुसर्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

शेहबाज शरीफ यांची कारकीर्द

शेहबाज शरीफ हे पाकिस्तानचे २४ वे पंतप्रधान असतील. ते ७२ वर्षांचे आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधानपद तीन वेळा भूषवलेले नवाज शरीफ यांचे ते बंधू आहेत. शेहबाज शरीफ यांनी एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२३ या काळात पाकिस्तानचे पंतप्रधानपद भूषवले हाेते. त्यावेळीही त्यांनी पीपीपीसोबत आघाडी करून सरकार चालवले होते. शेहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदासाठी ३३६ सदस्यीय संसदेत १६९ मतांची गरज हाेती. सोमवार, ४ मार्च रोजी शेहबाज शरीफ हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. मात्र कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. अखेर प्रदीर्घ चर्चेनंतर सर्वाधिक जागा मिळवल्या पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीने युती सरकार स्थापन करण्यावर सहमती दर्शवली. शेहबाज शरीफ यांनी शनिवारी पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज (३ मार्च) संसद सदस्यांनी मतदान केले. शरीफ यांच्या विरोधात 'पीटीआय'च्या वतीने उमर अयुब खान यांनी पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता. सभापती अयाज सादिक यांनी शेहबाज शरीफ आणि उमर अयुब खान पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे स्पष्ट करत सदस्यांना मतदान करण्याचे निर्देश दिले. मतदानावेळी सुन्नी इत्तेहाद कौन्सिलच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. अखेर गदारोळातच मतदान झाले.

शेहबाज सर्वोत्तम पर्याय : नवाज शरीफ

आगामी दीड ते दोन वर्षे पाकिस्तानसाठी अत्यंत कठीण असतील. आम्हाला या काळात एकजुटीने राहावे लागेल. आमच्या विरोधकांचा सामना करावा लागेल. या काळात शेहबाज शरीफ हे पंतप्रधानपदासाठीचे सर्वोत्तम पर्याय आहेत, असे पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजचे सर्वेसर्वा व माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande