रिपब्लिकन प्रायमरी निवडणुकीत भारतीय वंशाच्या निक्की हेलींकडून ट्रम्प पराभूत
* अमेरिकेच्या इतिहासात प्रायमरी निवडणूक जिंकणार्या पहिल्या महिला वॉशिंग्टन, ४ मार्च (हिं.स.) : वॉशिं
ट्रम्प निक्की हेली 


* अमेरिकेच्या इतिहासात प्रायमरी निवडणूक जिंकणार्या पहिल्या महिला

वॉशिंग्टन, ४ मार्च (हिं.स.) : वॉशिंग्टन डीसीमधील रिपब्लिकन प्रायमरी निवडणुकीत भारतीय वंशाच्या निक्की हेली यांनी प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये निक्की हेली यांना ६२.९ टक्के, तर ट्रम्प यांना ३३.२ टक्के मतं पडली. रिपब्लिकन पक्षाकडून माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि निक्की हेली या राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आहेत.

वॉशिंग्टन डीसीमधील विजयाने निक्की हेली यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी याआधीच्या प्रायमरी निवडणुकीत ट्रम्प यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. ट्रम्प यांना हरवल्याने हेली यांचा हा विजय मोठा असल्याचं म्हटलं जातंय. विशेष म्हणजे अमेरिकेच्या इतिहासात रिपब्लिकन प्रायमरी जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यामुळे हा विक्रम त्यांच्या नावावर झाला आहे.

अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी हा १०० टक्के शहरी भाग आहे. ट्रम्प यांचा दबदबा ग्रामीण भागात आहे. यावरून राजधानीच्या राज्यात ट्रम्प यांना नाकारण्यात आल्याचं चित्र आहे. ट्रम्प यांनी अनेकदा वॉशिंग्टन डीसीबाबत नकारात्मक वक्तव्य केली आहे. त्यामुळे येथील जनतेला त्यांची साथ नसल्याचं दिसतं. ट्रम्प यांच्यासह इतर काही नेते वॉशिंग्टनला क्राईम सिटी मानतात.

रिपब्लिकनकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार होण्यासाठी १,२१५ प्रतिनिधींचे समर्थन आवश्यक असते. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यामध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहे. यात डेमोक्रेटकडून जो बायडेन आणि रिपब्लिकनकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यातच लढत होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडण्यासाठी आधी पक्षाअंतर्गत प्रायमरी निवडणुका होतात. यात पक्षाकडून आधी राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडला जातो. विशेष म्हणजे याआधी ट्रम्प यांनी आठ प्रायमरी जिंकले आहेत.

अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीबाबत

रिपब्लिकन अध्यक्षपदाच्या नामांकनासाठी किमान १,२१५ प्रतिनिधींचा पाठिंबा आवश्यक आहे. वॉशिंग्टनमध्ये डेमोक्रॅटिक प्राइमरी जूनमध्ये होणार आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी जूनपर्यंत प्राथमिक निवडणुका होणार आहेत. यानंतर जुलैमध्ये रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शन होते, जिथे पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराची अधिकृतपणे प्रतिनिधींद्वारे निवड केली जाते, त्यानंतर ऑगस्टमध्ये लोकशाही राष्ट्रीय अधिवेशन होते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक ५ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande