'अब की बार भाजप तडीपार', शिक्कामोर्तब तुम्हाला करायचंय - उद्धव ठाकरे
पनवेल, 4 मार्च (हिं.स.) - देशाच्या राजकारणात भाजप इतका खोटारडा पक्ष जन्माला आला नाही. 'जुमला म्हणजे
उद्धव ठाकरे


पनवेल, 4 मार्च (हिं.स.) - देशाच्या राजकारणात भाजप इतका खोटारडा पक्ष जन्माला आला नाही. 'जुमला म्हणजे भाजप' अशी तुलना करत भाजपने जुमल्याचे नाव बदलून 'मोदी की गॅरंटी' केले. मोदींनी १० वर्षांत फक्त काँग्रेसच्या काळातल्या योजनांची नावे बदलण्याची कामे केली. स्टेशनांचीही नावे बदलली. त्यामुळे या देशात चुकूनही पुन्हा भाजपचे सरकार आले, तर देशातील ही शेवटची निवडणूक ठरेल. भाजपने 'अब की बार ४०० पार' अशी घोषणा दिली आहे. त्यावर 'अब की बार भाजप तडीपार' असे आवाहन करून मी नोटीस दिलीय, शिक्कामोर्तब तुम्हाला करायचं आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

पनवेलमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांनी केले. त्यानंतर जनसंवाद सभेत ते बोलत होते. मावळ आणि रायगड लोकसभा मतदारसंघ म्हणजे एक शिवछत्रपतींची जन्मभूमी तर दुसरी शिवरायांची कर्मभूमी आणि राजधानी. अशा ठिकाणी आपला पवित्र भगवा फडकणारच, अशा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्याचवेळी मी पुन्हा येईन म्हणता मग फोडाफोडी कशाला करता, असा सवालही ठाकरेंनी केला. तसेच भाजपला संकटात साथ देणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेला संपवायला निघालात. शिवसेनेने खांद्यावर बसवून महाराष्ट्र फिरवला नसता, तर भाजपला खांदा द्यायला आज चार लोकही जमले नसते, अशी टीकाही ठाकरेंनी भाजपवर केली.

गद्दाराच्या नायकाला विचारा मी असं काय दिलं नव्हतं? सर्व दिलं तरी पाठीत वार केला. याने दाढी खाजवण्यासाठी देखील लोकं ठेवलेले असतील, इतका पैसा आहे. घोड्यावर बसलो म्हणजे यांना वाटतं घोडा माझा, मात्र घोडा कसा लाथ मारतो ते बघा, अशी टीका ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

पीएम केअर फंडचे लाखो रुपये गेले कुठे?

ठाकरे म्हणाले, भाजपकडे प्रचंड पैसा आहे, पीएम केअर फंडचे लाखो रुपये गेले कुठे? कोरोना काळात तो निर्माण केला, राज्यातल्या भाजपच्या नेत्यांनी तिकडे पैसे दिले. त्या फंडाचा बाप कोण आहे? आमचं सरकार आल्यावर तो फंड आमच्याकडे येणार आहे की नाही? उगाच कोणावरही भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला आणि अजित पवार तिकडे गेले. सीतारमण यांनी आरोप केला आणि अशोक चव्हाण तिकडे गेले, असंही ठाकरेंनी नमूद केलं.

काँग्रेसच्या काळातील योजनांचे नामांतर केले

कोविड काळात देशाला कौतुक वाटेल असं काम आपण केलं. लसीकरण, चाचण्यांत वाढ केली होती. तेव्हा गद्दाराला कळलं नाही ग्रामीण रुग्णालय नाही. फक्त स्वत:चा विचार केला. १० वर्षात यांनी केलं काय? काँग्रेसच्या काळातील योजना नामांतर केल्या. तुमच्या नेत्यांची नावं देता, जुमल्याचं नाव मोदी गॅरंटी झालं आहे, असेही ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande