नाव बदलून अरुणाचल चीनला मिळेल का...? – एस. जयशंकर
नवी दिल्ली, 01 एप्रिल (हिं.स.) : चीन सातत्याने अरुणाचप्रदेशवर दावा ठोकत असतो. त्यासाठी चीनच्या कुराप
एस. जयशंकर


नवी दिल्ली, 01 एप्रिल (हिं.स.) : चीन सातत्याने अरुणाचप्रदेशवर दावा ठोकत असतो. त्यासाठी चीनच्या कुरापती सुरु असतात. चीनने अरुणाचलच्या 30 जागांची नावे बदलून नवी यादी जाहीर केली. या कृत्याला भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेय. अरुणाचलचे नाव बदलून हा भूभाग चीनला मिळेल का.. ? असा सवाल जयशंकर यांनी उपस्थित केला आहे.

चीनने आज, सोमवारी भारतातील विविध ठिकाणांच्या 30 नवीन नावांची चौथी यादी जाहीर केली आहे. चीनी सरकारी मीडिया 'ग्लोबल टाईम्स' नुसार, चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने 'जंगनान'मधील भौगोलिक नावांची चौथी यादी जाहीर केली. चीन अरुणाचल प्रदेशला 'जंगनान' म्हणतो आणि राज्यावर दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा करतो. मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रदेशासाठी 30 नावे देखील पोस्ट करण्यात आली आहेत. ही यादी 1 मे पासून लागू होणार आहे. तिथल्या मंत्रालयाने यापूर्वी 2017 मध्ये जंगनान मधील सहा ठिकाणांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली, तर 2021 मध्ये 15 ठिकाणांची दुसरी यादी जाहीर केली होती. त्यानंतर 2023 मध्येही 11 ठिकाणांच्या नावांसह तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना एस. जयशंकर म्हणाले की, मी तुमच्या घराचे नाव बदलले, तर ते माझे होईल का ? अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य घटक आहे. नाव बदलून काहीही होणार नाही. भारताचे सैन्य एलएसीवर तैनात असून आमचे सैनिक आपले काम योग्यरित्या करतील असा इशाराच जयशंकर यांनी दिला.

दरम्यान, अरुणाचल प्रदेश भारताचा भाग असल्याचे म्हणत अमेरिकेने यापूर्वीच चीनवर टीका केली आहे. तसेच, एलएसीवर सीमा विस्तारासाठी चीनने उचललेल्या पावलांचा अमेरिकेने निषेधही केला होता.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande