छत्तीसगडमध्ये 13 नक्षलवादी ठार 10 मृतदेह ताब्यात
बिजापूर, 02 एप्रिल (हिं.स.) : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात आज, मंगळवारी झालेल्या चकमकी
संग्रहित


बिजापूर, 02 एप्रिल (हिं.स.) : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात आज, मंगळवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी सुमारे 13 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. संध्यकाळपर्यंत पोलिसांनी 10 मृतदेह ताब्यात घेतले आहेत. यावेळी नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. दरम्यान परिसरात सुरक्षा दलांची शोध मोहिम सुरु आहे.

यासंदर्भात माहिती देताना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गांगलूर पोलिस स्टेशन परिसरात नक्षलवादी कारवायांची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सुरक्षा दलांना नक्षलविरोधी अभियानात पाठवण्यात आले. या टीममध्ये डीआरजी, एसटीएफ, कोब्रा आणि सीआरपीएफचा समावेश होता. ही संयुक्त टीम शोध मोहिमेसाठी गंगलूर परिसरात रवाना झाली होती. या कारवाईदरम्यान मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेंद्रा जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही बाजूंनी काही वेळ गोळीबार झाल्यानंतर नक्षलवादी तेथून पळून गेले. त्यानंतर घटनास्थळाची झडती घेतली असता सुरुवातीला काही नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि एक ऑटोमॅटिक लाइट मशीन गन (एलएमजी), 'बॅरल ग्रेनेड लाँचर' आणि इतर शस्त्रे सापडली. मारले गेलेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवली गेली. तसेच परिसरात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले त्यात संध्याकाळपर्यंत 10 नक्षलवाद्यांचे मृतदेह गवसल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्या 1 जानेवारीपासून आतापर्यंत विजापूर जिल्ह्यासह बस्तर भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 45 नक्षलवादी ठार झाले आहेत. सुकमा जिल्हा बस्तर लोकसभा मतदारसंघात आहे जेथे 19 एप्रिल रोजी सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande