रत्नागिरी : संगीत रंगभूमीवर पुन्हा खल्वायनचा नवीन नाटकाचा ठसा
रत्नागिरी, 2 एप्रिल, (हिं. स.) : संगीत रंगभूमीवर नवनवीन संगीत नाटकांची निर्मिती करून, संगीत राज्य ना
खल्वायनचे कलाकार


रत्नागिरी, 2 एप्रिल, (हिं. स.) : संगीत रंगभूमीवर नवनवीन संगीत नाटकांची निर्मिती करून, संगीत राज्य नाट्य स्पर्धेत सातत्यपूर्ण आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या खल्वायन या संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित ६२ व्या राज्य नाट्य स्पर्धेत डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित संगीत अमृतवेल या नव्या कोऱ्या नाटकाचे सर्वांगाने उत्कृष्ट सादरीकरण करीत ८ वैयक्तिक पारितोषिकांसह सांघिक तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

या नाटकासाठी अभिनय रौप्य पदक अनिकेत आपटे, गायन रौप्यपदक सावनी शेवडे, तबलासाथ प्रथम हेरंब जोगळेकर, नेपथ्य प्रथम प्रदीप तेंडुलकर, नाट्यलेखन द्वितीय डॉ. श्रीकृष्ण जोशी, संगीत दिग्दर्शन द्वितीय राम तांबे, ऑर्गनसाथ द्वितीय स्वानंद नेने, गायन गुणवत्ता प्रमाणपत्र अनामय बापट यांनी यश मिळवले.

एकाच लेखकाची ७ नवीन नाटके मोठ्या धाडसाने व कल्पकतेने रंगभूमीवर आणून, त्याची यशस्वी निर्मिती करून, संगीत रंगभूमीवर नवनवीन कलाकार उदयाला आणून, संगीत रंगभूमीवर एक आगळेवेगळे स्थान खल्वायनने निर्माण केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात नवीन संगीत नाटकांची निर्मिती करण्याची मुहूर्तमेढसुद्धा खल्वायन संस्थेने १९९८ साली रोवली आहे.

संगीत नाटक ही जागतिक रंगभूमीला मिळालेली देणगी आहे, असे म्हटले जाते. जुन्या त्याच त्याच नाटकांचे रंगभूमीवर तेच तेच प्रयोग अनेक वर्षे अनेक संस्था करीत आहेत. पूर्वीच्या दिग्गज कलाकारांनी संगीत नाटकातील अनेक भूमिका अजरामर करून ठेवल्या आहेत. त्या भूमिका तशाच प्रकारे वठवण्याचा प्रयत्न अनेक जुने-नवे कलाकार करीत असतात. परंतु त्याच त्याच भूमिका तेच तेच कलाकार, तीच तीच गाणी यामुळे प्रेक्षकांना ते रुचेनासे झाले आणि त्यामुळे संगीत रंगभूमीवरील प्रेक्षक संख्या कमी होत जाऊन संगीत रंगभूमीला मरगळ आली, संगीत रंगभूमीला ऊर्जितावस्था येण्यासाठी नवीन नाटक सादर करायचे आव्हान स्वीकारून १९९८ साली संस्थेने रत्नागिरीतील नाट्यलेखक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या संगीत स्वरयात्री नाटकाने आपल्या संगीत रंगभूमीवरील कार्याची मुहूर्तमेढ रोवली. यापूर्वी रत्नागिरी व आजूबाजूच्या परिसरात जुन्या संगीत नाटकांचे प्रयोग उत्सवाच्या निमित्ताने अथवा एखाददुसरी संस्था राज्य नाट्य स्पर्धेनिमित्ताने नाटक करत होती. परंतु नवीन नाटक बसवायचे धाडस कोणी करीत नव्हते. नवीन नाटकासाठी आवश्यक असे नेपथ्य, दिग्दर्शनातील बारकावे, संगीतकाराकडून गाण्याच्या चाली तयार करून घेणे, न कंटाळता तालमी घेणे, उपलब्ध कलाकारांतून भूमिकेला साजेल, अशी पात्र निवड करणे अशा अनेक गोष्टींमधून संस्थेने आपली संगीत रंगभूमीवरील कारकीर्द उदयाला आणली. राज्य नाट्य स्पर्धेबरोबर नवी दिल्ली येथील नाट्य स्पर्धेतही संस्थेने ८ वर्षे सहभाग घेऊन तेथेही घवघवीत यश संपादन केले आहे.

डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित स्वरयात्री, घन अमृताचा, शांतिब्रह्म, राधामानस, ऐश्वर्यवती, ऋणानुबंध व अमृतवेल अशा 7 नवीन नाटकांची निर्मिती व डॉ. विद्याधर ओक लिखित ताजमहाल या आणखी एका नव्या संगीत नाटकांची यशस्वी निर्मिती करून महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत या ८ पैकी ३ नाटकांना प्रथम क्रमांक, एका नाटकाला दुसरा क्रमांक व एका नाटकाला तृतीय क्रमांक तसेच नवी दिल्लीतील स्पर्धेतसुद्धा यापैकी एका नाटकाला प्रथम क्रमांक व एका नाटकाला तृतीय क्रमांक मिळाला आहे. या नाटकांचे मुंबई, दिल्ली, गोवा, मध्य प्रदेश, पुणे, औरंगाबाद आदी ठिकाणच्या नाट्य महोत्सवात प्रयोग झाले आहेत.

संस्थेने दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी होणारी मासिक संगीत सभा (३००), गुढी पाडवा व दिवाळी पाडवा (५० सभा) या दिवशी होणाऱ्या विशेष संगीत सभा यामध्ये गेली २७ वर्षे सातत्य राखले आहे. पण संगीत रंगभूमीवरसुद्धा जुन्यापेक्षा नवीन नाटकाची निर्मिती करण्यामध्येही सातत्य राखले आहे. नव्या नाटकांबरोबरच जुन्या संगीत सौभद्र, संगीत कट्यार काळजात घुसली, संगीत प्रीतिसंगम, संगीत संशयकल्लोळ, संगीत ययाति आणि देवयानी, संगीत मत्स्यगंधा या नाटकांचीसुद्धा तेवढ्याच ताकदीने निर्मिती करून घवघवीत यश संपादन केले आहे. अशा प्रकारे लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, साथ संगत, पार्श्वसंगीत, अभिनय इत्यादी नाटकातील सर्व अंगांचा कल्पक बुद्धिमत्तेने योग्य प्रकारे विचार करून यशस्वी सादरीकरण करणारी खल्वायन ही रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेकाद्वितीय संस्था ठरली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande