कर्जाचे हफ्ते थकल्यामुळे फ्लॅटधारकांना महापालिकेची नोटीस
अमरावती, 2 एप्रिल, (हिं.स.) - पंतप्रधान आवास योजनेच्या घटक तीन अंतर्गत सदनिका (फ्लॅट) च्या कर्जाचे ह
कर्जाचे हफ्ते थकल्यामुळे फ्लॅटधारकांना महापालिकेची नोटीस


अमरावती, 2 एप्रिल, (हिं.स.) - पंतप्रधान आवास योजनेच्या घटक तीन अंतर्गत सदनिका (फ्लॅट) च्या कर्जाचे हफ्ते थकल्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना महापालिकेकडून नोटीस देण्यात आली. प्रसंगी त्या लाभार्थ्यांना घरकुलाचा ताबाही सोडावा लागण्याची शक्यता आहे. घरकुल आवास योजनेंतर्गत घटक तीनमध्ये सुमारे २५० नागरिकांना सदनिका देण्यात आले आहे. त्यासाठी जवळपास अडीच लाख रुपये शासनाचे अनुदान देण्यात आले असून, उर्वरित हिस्सा लाभार्थ्यांनाभरावा लागणार होता. लाभार्थ्यांच्या हिश्यासाठी त्यांना वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. त्या कर्जाची नियमित परतफेड करणे लाभार्थ्यांना बंधनकारक होते; मात्र काही लाभार्थ्यांनी वेगवेगळ्या कारणांनी बँकेकडे कर्जाचे हप्ते भरलेच नाही.

सदर लाभार्थ्यांची शिफारस महापालिकेच्या ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) द्वारे करण्यात आली होती. त्यामुळे आता कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेकडून महापालिकेकडे तगादा लावल्या जात आहे. त्याअनुषंगाने महापालिकेने लाभार्थ्यांना नोटीस देऊन कर्जाची परतफेड करण्यासाठी काही अवधी दिला. त्या अवधीनंतरही काही लाभार्थी हफ्ते भरण्यास तयार नाही. परिणामी, आता त्यांची सदनिका ताब्यात घेऊन ती सदनिका दुसऱ्या अर्जदाराला देणे व त्याच्याकडून कर्जाची परतफेड करून घेण्याचा पर्याय महापालिकेपुढे आहे.

त्यानुसार ३ एप्रिलपर्यंतची मुदत संबंधित लाभार्थ्यांना देण्यात आली असून, त्यानंतर संबंधित सदनिकांवर महापालिका ताबा घेऊ शकते. त्यामुळे - ज्या लाभार्थ्यांचे हफ्ते अनियमित आहे, त्यांनी कर्जाची नियमित परतफेड करावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande