पवार संपले म्हणणारे विरोधीपक्षात जाऊन बसले होते
शरद पवारांनी लगावला देवेंद्र फडणवीसांना टोला नागपूर, 02 एप्रिल (हिं.स.) : शरद पवारांचे राजकारण संपल
शरद पवार


शरद पवारांनी लगावला देवेंद्र फडणवीसांना टोला

नागपूर, 02 एप्रिल (हिं.स.) : शरद पवारांचे राजकारण संपले असे काही लोक 2019 मध्ये म्हणत होते. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्यांना विरोधी पक्षात जाऊन बसावे लागले होते. तसेच आताही ते डेप्युटी आहेत असे सांगत शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. नागपुरातील प्रेसक्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते मंगळवारी बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वर्धा मतदारसंघातून अमर काळे आणि यवतमाळमधून संजय देशमुखांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यासाठी विदर्भ दौऱ्यावर असलेल्या पवारांनी संध्याकाळी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. निवडणूक प्रचारात विरोधकांकडून शरद पवारांचे राजकारण संपले असा प्रचार सुरू असल्याबाबत विचारले असता. पवारांनी त्यावर आपल्या खास शैलीत भाष्य केले. यावेळी पवार म्हणाले की, गेल्या निवडणुकीत शरद पवारांचे राजकारण संपले असे म्हणणारे निवडणुकीनंतर विरोधी पक्षात जाऊन बसले होते. पुढील अडीच वर्षे शरद पवारांच्या सहकाऱ्यांनी सरकार चालवले असे शरद पवार यांनी सांगितले. यावेळी बारामती मतदारसंघातील लढतीबाबत पवार म्हणाले की, बारामतीमध्ये अजून निवडणूक प्रक्रिया सुरु झालेली नाही. मतदान व्हायचे आहे. मतदान झाल्यानंतरच येथील जनतेचा कल कळेल. यापूर्वी बारामतीमधून सुप्रिया सुळे जिंकल्या आहेत. भविष्यातही त्या जिंकतील, ही अपेक्षा असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.

वर्धा आणि यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवारांचे अर्ज भरताना लोकांचा प्रतिसाद अभूतपूर्व होता. लोकांमध्ये एक परिवर्तनाची भावना आहे. फक्त एकच काळजी आहे की, दोन दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या सभेत विरोधी पक्षांचे नेते होते. सर्वांची भावना होती की, देशात लोकशाहीवर हल्ला होत आहे. आदिवासी राज्याचे आदिवासी मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्रीही तुरुंगात आहेत. देशाच्या घटनेवर हल्ला होत आहे. त्यामुळेच विरोधी पक्षांनी आघाडी केली. येत्या काही दिवसांमध्ये आणखी नेत्यांना तुरुंगात टाकले जाऊ शकते. परिस्थिती आणखी बिघडू शकते, असेही शरद पवार यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande