अमरावती : आरटीई प्रवेश प्रक्रिया रखडली
अमरावती, 2 एप्रिल (हिं.स.) : शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठीची प
अमरावती : आरटीई प्रवेश प्रक्रिया रखडली


अमरावती, 2 एप्रिल (हिं.स.) : शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया या शैक्षणिक सत्रात बरीच अडचणीत सापडली आहे. दरवर्षी आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होत होते. तर फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत होती. मात्र आता मार्च महिना उलटला तरीही साधे वेळापत्रक जाहीर झाले नसल्याने प्रकिया केव्हा सुरू होणार, असा प्रश्न पालकांना पडला आहे.

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा रिक्त असतात. त्यामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना हा नियम अत्यंत दिलासादायक होता. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज जात होते. मात्र आरटीई रकमेची परिपूर्ती मिळाली नसल्याची ओरड शाळांकडून होत होती. दरम्यान, या सत्रापासून शिक्षण विभागाने नियमावलीत बदल करत शासकीय आणि अनुदानित शाळा उपलब्ध नसलेल्या भागातच खासगीत प्रवेश घेता येणार असल्याचे कळविले. त्यानुसार संपूर्ण शाळांची नोंदणी झाली आहे. मात्र अद्यापही वेळापत्रक जाहीर झाले नसल्याने केव्हा होणार, असा प्रश्न आहे.

यंदाच्या नव्या नियमाचा पालकांत विरोध

शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील आरटीई प्रवेशांसाठी शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा केली. त्यानुसार खासगी शाळांऐवजी प्राधान्याने शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले. शासकीय आणि अनुदानित शाळा उपलब्ध नसलेल्या भागातच खासगी शाळेत प्रवेश घेता येणार आहे. या बदलावर शिक्षण क्षेत्रातून, पालक संघटनांकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला.'

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande