अभावग्रस्त मुलांसाठी क्रिकेट अकादमी स्थापन करणार - आमीर हुसेन लोन
नाशिक, १० मे, (हिं.स.) : गावातील तरुणांना क्रिकेट खेळणे, शिकणे सोपे व्हावे यासाठी गावात एक टर्फ सुरू
अभावग्रस्त मुलांसाठी क्रिकेट अकादमी स्थापन करणार - आमीर हुसेन लोन


नाशिक, १० मे, (हिं.स.) : गावातील तरुणांना क्रिकेट खेळणे, शिकणे सोपे व्हावे यासाठी गावात एक टर्फ सुरू केले आहे. आता अकादमी सुरू करण्याचा मानस जम्मू-कश्मीर येथील सुप्रसिद्ध दिव्यांग क्रिकेटपटू आमीर हुसेन लोन याने येथे व्यक्त केला. या सर्व प्रवासात मला आजीची खुपच मोलाची साथ मिळाली, असेही त्याने नमूद केले.

वसंत व्याख्यानमालेत स्व. सदुभाऊ भोरे स्मृती व्याख्यानात ज्येष्ठ क्रीडा समीक्षक नितीन मुजुमदार यांनी आमीरची प्रकट मुलाखत घेतली. सुरेश कापडिया, शैलेश भोरे व्यासपीठावर उपस्थित होते. कापडिया यांनी आमीरचे स्वागत केले. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. मुजुमदार यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देताना आमीरने आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी आणि क्रिकेटकडे वळल्याबाबत सांगत नाशिककरांशी संवाद साधला.

एका अपघातात दोन्ही हात गमावल्याची हृदयद्रावक कहाणीही त्याने सांगितली. कुणी काहीही म्हटले तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा मंत्र माझ्या आजीने दिला. तर माझ्यासाठी आई-वडिलांनीही सारेकाही विकले. मला सतत प्रेरणा दिली. त्यामुळेच मी येथपर्यंत पोहचू शकलो. अत्यंत दुर्बल आर्थिक परिस्थितीत जिद्दीने शिक्षण पुर्ण केले. क्रिकेटर बनणे हे स्वप्न होते. मात्र हाथच नसल्यामुळे हतबल होतो. त्याकाळी घरापासून दुर एका घरात टीव्हीवर क्रिकेटचा सामना बघायला गेलो. महत्प्रयासाने सचिन तेंडुलकरचा खेळ बघितला आणि कुणावरही अवलंबुन न राहता स्वतःचा खेळ विकसित करण्याचा निर्धार केला. पहिला सामना दिल्लीत केरळविरुद्ध खेळल्याचे सांगुन त्याने काही प्रसंगही कथन केले. या सामन्यात पहिल्याच चेंडुवर विकेट मिळाली आणि फलंदाजीतही 18 धावा काढुन नाबाद राहिलो. त्यावेळी झालेल्या कौतुकानंतर मागे वळुन बघितलेच नाही.

सचिन तेंडुलकरशी पहिली भेट, मिडियाच्या समोर जातानाची मनस्थिती, सचिनने केलेले स्वागत व त्याच्याशी मारलेल्या गप्पा या विषयी त्याने सविस्तर चर्चा केली. ठाणे येथे झालेल्या आयएसपीएल स्पर्धेवेळचा प्रसंगही आपल्यासाठी सर्वाधिक गौरवशाली असल्याचे आमीरने सांगितले. आई- वडिलांचे आशीर्वाद सर्वांच्या जीवनात खुप महत्वाचे असतात. त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या पाल्याला भरभरून आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही त्याने यावेळी केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande