पंतप्रधानांचा मुंबईत भव्य दिव्य रोड शो संपन्न
- रोड शो मार्गावर लोकांची प्रचंड गर्दी - परिसर भगवामय, समारोपाच्या जागेवर प्रभू श्रीरामांचा भव्य पुत
पंतप्रधान रोड शो


- रोड शो मार्गावर लोकांची प्रचंड गर्दी

- परिसर भगवामय, समारोपाच्या जागेवर प्रभू श्रीरामांचा भव्य पुतळा

- पोलिसांसह सुरक्षा व्यवस्था मोठा बंदोबस्त

मुंबई, 15 मे (हिं.स.) - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील अंतिम आणि पाचव्या टप्प्यातील प्रचाराला अखेरचे दोन-तीन दिवस राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईतील घाटकोपरमध्ये भव्य रोड शो पार पडला. या रोड शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे उमेदवार आणि महायुतीचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. शुक्रवारी (१७ मे) शिवाजी पार्कमध्ये महायुतीचा महाविजय संकल्प सभा पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा रोड शो महत्वाचा मानला जात आहे. भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यासह मुंबईच्या सहा मतदारसंघातील उमेदवारांच्या एकत्रित प्रचारासाठी हा रोड शो आयोजित करण्यात आला होता. घाटकोपरच्या अशोक सिल्क मिल जवळून मोदींच्या रोड शोला सुरुवात झाली आणि घाटकोपर पूर्वेकडील पार्श्वनाथ जैन मंदिराजवळ त्याचा समारोप झाला. यामुळे ईशान्य मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले होते.

पंतप्रधानांचा रोड शो होत असलेल्या मार्गावर लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. संपूर्ण घाटकोपर आज भगवामय झाला होता. साधू, संत, महात्मे देखील यावेळी उपस्थित होते. तर काही वारकरी देखील मोदींचे स्वागत करण्यासाठी आले होते. समारोपाच्या जागेवर प्रभू श्रीरामांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. पुतळ्याला अभिवादन करून रोड शोचा समारोप होणार आहे. या रोड शोसाठी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचा देखील वापर करण्यात आला.

घाटकोपर परिसर निवडण्यामागे महत्वाचे उद्देश मराठी आणि गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा मानस होता. यामुळे दोन्ही भाषिक मतदारांना प्रभावित करणे सोपे झाले. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा दुवा असं घाटकोपर हे मध्यवर्ती ठिकाण असून घाटकोपरला उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई हे पाच लोकसभा मतदारसंघ जोडतात. याचा फायदा पियुष गोयल, रविंद्र वायकर, मिहिर कोटेचा, उज्ज्वल निकम, राहुल शेवाळे या उमेदवारांना होणार आहे. घाटकोपरमध्ये उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय दोन्ही प्रकारचे लोक राहतात. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात हिंदू मतदार आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande