सत्तेत आल्यावर पुढील शंभर दिवसाच्या कामाची ब्लू प्रिंट तयार - पंतप्रधान
कल्याण, 15 मे (हिं.स.) - भारतामध्ये पहिल्यांदाच नवा आत्मविश्वास दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज

modi kalyan
मोदी कल्याण

कल्याण, 15 मे (हिं.स.) - भारतामध्ये पहिल्यांदाच नवा आत्मविश्वास दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणातून भारत पहिल्यांदाच बुलंद आत्मविश्वासासोबत मोठे लक्ष साध्य करत आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांमध्ये कोणते काम करायचे, कोणते निर्णय घ्यायचे, यावर काम झाले आहे. सरकार सत्तेत आल्यानंतर केवळ विजयाच्या माळा गळ्यात घालून फिरण्याचे काम केले नाही. आज मी जेवढी मेहनत करत आहे, तेवढीच मेहनत चार जूननंतर देखील करणार आहे. पुढील शंभर दिवसात सरकार काय करणार, याची ब्लू प्रिंट तयार करून आम्ही पुढे जात असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार डाॅ. श्रीकांत शिंदे आणि भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत मोदी बोलत होते. मला एवढा आत्मविश्वास का आहे? असा प्रश्न लोक विचारतात. मात्र, माझ्या आत्मविश्वासाचा मुद्दा नाही तर जनता जनार्दनांच्या विश्वासाचा मुद्दा आहे. देशातील तरुणांकडे नवी कल्पकता, नवीन आयडिया आहेत. प्रत्येक गोष्टीला नव्या पद्धतीने करण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. सध्या माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यांच्यामुळे मी खूप प्रभावित झालो आहे. देशातील युवकांना माझी वैयक्तिक विनंती किंवा आग्रह आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना देखील आवाहन केले. सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसात काय काम करायचे याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या शंभर दिवसात आणखी २५ दिवस वाढवण्याचा माझा विचार आहे. या २५ दिवसात काय करायला हवे, याचा सल्ला तरुणांनी आम्हाला पाठवावा. त्या २५ दिवसात ते काम करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे देखील पंतप्रधानांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या राजकुमाराकडून वीर सावरकरांबद्दल चार चांगले शब्द बोलून घ्यावे, असे आवाहनही मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवार गटाला केले. नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेस यांनी विनंती केल्यामुळे राहुल गांधी सावरकरांबद्दल निवडणुकीच्या काळात वाईट बोलत नसल्याचा दावा त्यांनी केला. जर नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राहुल गांधींच्या तोंडून सावरकरांबद्दल चार चांगले शब्द बोलून दाखवावे, असे आव्हानही मोदींनी दिले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande