नगरच्या निंबळकच्या कुस्ती हगामात रंगला चितपट कुस्त्यांचा थरार
अहमदनगर, 27 मे (हिं.स.):- निंबळक (तालुका नगर) येथील ग्रामदैवत श्री खंडेराया यात्रेनिमित्त माजी जिल्ह
निंबळक च्या कुस्ती हगाम्यात रंगला चितपट कुस्त्यांचा थरार


अहमदनगर, 27 मे (हिं.स.):- निंबळक (तालुका नगर) येथील ग्रामदैवत श्री खंडेराया यात्रेनिमित्त माजी जिल्हा परीषद सदस्य माधवराव लामखडे यांनी कै.संजय लामखडे व कै.विलास लामखडे यांच्या स्मरणार्थ भरविण्यात आलेल्या जंगी कुस्ती हगाम्यात नामवंत पहिलवानांच्या डावपेचांचा थरार रंगला होता.लाल मातीच्या आखाड्यात तोडीस तोड मल्ल उतरल्याने आखाडा रंगतदार झाला.सलग आठ तास हगामा रात्री उशीरा पर्यंत सुरु होता. लाखो रुपयांचे बक्षीसे मल्लांना देण्यात आले.माधवराव लामखडे गेल्या तीस वर्षापासून स्वखर्चातून हगाम्याचे आयोजन करत आहेत.

ग्रामदैवत श्री खंडेरायांची यात्रा सालाबादप्रमाणे या वर्षीही उत्साहात यात्रा पार पडली. पाचशे रुपायापासून पन्नास हजार रूपयां पर्यन्त कुस्त्या लावण्यात आल्या.कुस्त्या इतक्या रंगतदार झाल्या की प्रेक्षकानी मोठया प्रमाणात बक्षिसांचा वर्षाव केला.चितपट कुस्त्यांचा थराराने ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.डाव-प्रतिडावाने मल्लांनी आपल्या उत्कृष्ट खेळाची चुणूक दाखवली.हलगी व डफाचा निनाद,मातीत रंगलेला कुस्तीच्या डावपेचांचा थरार,आखाड्या भोवती जमलेले पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विजयी मल्लांवर होणारा बक्षिसांचा वर्षाव अशा उत्साहपुर्ण वातावरणात हगामा पार पडला. जवळपास तीनशेपेक्षा जास्त कुस्त्या या वेळी झाल्या.पंच म्हणून बाळासाहेब गायकवाड,बाळासाहेब साठे, साहेबराव सप्रे,अजय लामखडे,केतन लामखडे यांनी काम पाहीले.या हगाम्यात महिला कुस्तीपटूंनी देखील शड्डू ठोकून आपल्या खेळाचे कौशल्य दाखविले.हगाम्याला माजी आमदार निलेश लंके यांनी भेट दिली असता, त्यांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या.लंके म्हणाले की,निंबळकच्या यात्रेतील हगामा राज्यात प्रसिद्ध आहे.माधवराव लामखडे हगाम्याचे उत्कृष्ट नियोजन करुन,मल्लांवर मोठ्या प्रमाणात बक्षीसांची उधळण करतात.लामखडे परिवाराच्या वतीने विविध खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने सुरु आहे.दिवाळी क्रिकेट स्पर्धा देखील भव्य स्वरुपात केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

माधवराव लामखडे म्हणाले की,दरवर्षी निंबळकच्या हगाम्यात राज्यातील नामवंत मल्ल हजेरी लावत असतात.३० ते ३५ वर्षापासून गावात कुस्ती हगामा व क्रिकेट स्पर्धा सुरु आहे.खेळाला प्रोत्साहन देण्याची ही परंपरा कायम पुढे सुरु राहणार असून,याची भव्यता आनखी वाढणार आहे.तर गावा तील धार्मिक व सांस्कृतिक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी लामखडे परिवार कटिबध्द असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande