मालेगाव फायरिंग प्रकरणात दोघा आरोपींना अटक
मालेगाव, २८ मे, (हिं.स) - मालेगावचे माजी महापौर व एमआयएमचे महानगरप्रमुख अब्दुल मलिक युनुस शेख यांच्य
मालेगाव फायरिंग प्रकरणात दोघा आरोपींना अटक


मालेगाव, २८ मे, (हिं.स) - मालेगावचे माजी महापौर व एमआयएमचे महानगरप्रमुख अब्दुल मलिक युनुस शेख यांच्यावर परवा पहाटे दोन मोटारसायकल स्वरांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. यात अब्दुल मलिक हे गंभीररित्या जखमी झाले होते. यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असुन या दोघांकडून घटनेत वापरलेली गावठी पिस्तुल व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. तर या घटनेचा तपास करत असताना पोलिसांच्या असे लक्षात आले की मलिक यांच्यासोबत असलेल्या दोन जणांनी देखील क्रॉस फायरिंग केली. त्यांच्यावर देखील आर्मॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून यातील एका आरोपीला अटक केली असून एक जण फरार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी पत्रकार परिषदेत दिली.

27 तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास सुपर मार्केट समोरील प्लीज बिल्डिंग मटेरियल सप्लायर या बिल्डिंग समोर मालेगावचे माजी महापौर व एमआयएमचे महानगर प्रमुख अब्दुल मलिक शेख हे त्यांच्या मित्रांसोबत बसले होते. यावेळी मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यात अब्दुल गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ प्रथम उपचार करून नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच आपली गुप्तचर यंत्रणा कामाला लावून या दोन्ही आरोपांची ओळख पटवली व त्यांना तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केल्याची माहिती मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यावेळी त्यांनी सांगितले की, तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये मलिक यांच्यासोबत असलेल्या दोघांनी देखील त्यांच्या जवळील पिस्तूल मधून क्रॉस फायरिंग केल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्यांच्या दोन कार्यकर्त्यांवर देखील आर्मॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एका आरोपीला अटक करण्यात आली. दुसरा आरोपी फरार असल्याचे भारती यांनी सांगितले. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी जागोजागी नाकाबंदी करण्यात येणार असल्याचेही भारती यांनी सांगितले. हा कोणत्याही प्रकारचा राजकीयवाद नसून जमिनीच्या व्यवहारात गोळीबार केल्याचे आरोपींनी कबुली जबाबात सांगितल्याचे देखील भारती यांनी सांगितले.

मेट्रो सिटीच्या धर्तीवर मालेगाव शहरात गुन्हेगारी वाढली...?

मालेगाव शहर जवळपास दहा लाख लोकसंख्येचे गाव असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे. शहरात गेल्या दोन-तीन महिन्यात मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात आला असून मालेगाव आता मेट्रोसिटी सारख्या गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहे. मागे येथे कॉम्बिंग ऑपरेशन केले असता जवळपास 30 पेक्षा जास्त पिस्तल तलवार चोपर कोयते अशी हत्यारे जप्त करण्यात आली होती. यावेळी सराईत गुन्हेगांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र सध्या याकडे कोणी लक्ष देत नसल्याने मेट्रो सिटीच्या जातीवर मालेगाव शहरात गुन्हेगारी वाढत असल्याची चर्चा मालेगाव मध्ये सुरू आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande