बुलडाणा जिल्हाभरात रेती साठ्यावर जप्तीची कारवाई
बुलडाणा, 28 मे (हिं.स.) : जिल्हाभरात अवैध वाळूविरोधात कारवाई करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने विविध
बुलडाणा जिल्हाभरात रेती साठ्यावर जप्तीची कारवाई


बुलडाणा, 28 मे (हिं.स.) : जिल्हाभरात अवैध वाळूविरोधात कारवाई करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने विविध ठिकाणी अवैधपणे साठविलेला वाळूसाठा आणि वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली वाळू त्याचठिकाणी लिलाव करून संबंधितांना देण्यात आली.

मेहकर शहरात एका ठिकाणी 30 ब्रास रेतीचा साठा जप्त करण्यात आला. हिवरा आश्रम, ता. मेहकर येथे रस्तावर 3 ब्रास रेतीचा साठा रात्री जप्त करण्यात आला. सदर रेतीसाठा रात्रीच गावातील घरकुल लाभार्थीना वाटप करण्यात आला. आज दिवसभरात मलकापूर तालुक्यात विविध ठिकाणी पथकाद्वारे 300 ब्रास पर्यंत रेती साठा जप्त करण्यात आला. वडोदा, ता. मलकापूर येथे 50 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला. वाघुड, ता. मलकापूर येथे 60 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला. मलकापूर येथील गुरुद्वाराजवळ अंदाजे 60 ब्रास साठा जप्त करण्यात आला. मलकापूर येथील हाश्मीनगरमध्ये 50 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला.

नांदुरा खुर्द, ता. नांदुरा येथे अंदाजे 120 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला. जुने बेलाड गावठाण येथे अजून 300 ब्रास साठा जप्त करण्यात आला. आज बेलाड, ता. नांदूरा येथे सुमारे 125 ब्रास रेती जप्त करण्यात आली असून लिलावाची कार्यवाही करण्यात येत आहे. खामगाव येथेील मोठी बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी अवैध वाळूविरोधात कारवाई करण्यात येत आहे. याठिकाणच्या रेतीच्या स्टॉकचे पंचनामे करण्यात येत आहे. त्यांना नोटीस देऊन पावती नसल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.

आज कठोरा, ता. शेगाव येथे पहाटे उपविभागीय पोलिस अधिकारी खामगाव, ठाणेदार जळंब, शेगावचे नायब तहसीलदार काळदाते, तलाठी यांच्यासह कारवाई करण्यात आली. यात एक जेसीबी, एक टिप्पर जप्त करण्यात आले आहे. यात 300 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला असून शासकीय कामाकरीता देण्यात येणार आहे.

मेहकर तालुक्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या पथकासह संयुक्त मोहिम राबविण्यात आली. किनगाव जट्टू, सावरगाव तेली, भुमराळा व वझर आघाव येथील अवैध रेतीसाठा आणि जमा करण्यात आलेल्या रेतीसाठा तपासणी, पडताळणी करण्यात आली. यात सावरगाव तेली येथील नदीकाठावर जाणारा नाल्यातील रस्ता जेसीबीने खोदून बंद करण्यात आला. भुमराळा येथे गावातील घरासमोर रस्त्याच्या कडेला, खुल्या जागेत असलेल्या लहान रेतीसाठ्यांची तपासणी करून सुमारे 30 ब्रास रेतीसाठा जप्त करून लिलाव करण्यात आला.

वझर येथील सरकारी ई-क्लास, खुल्या जागेवरील रेती ढिगाऱ्याची तपासणी केली असता याठिकाणी 180 ब्रास रेती साठा आढळून आला. सदर वाळू ग्रामपंचायतीला शासकीय कामाकरीता देण्यात आली. काल वझर आघाव, ता. लोणार येथे 180 ब्रास आणि भुमराळा येथे 31 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला. ही रेतीची लिलाव करण्यात आली. दरम्यान, आज लोणार येथे 437 ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. सदर वाळूचा लिलाव करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. सदर जप्तीची कार्यवाही उपविभागीय अधिकारी राजेंद्र जोगी, यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या पथकाने काल मेहकर आणि लोणार तालुक्यात 4 टिप्परवर कार्यवाही करून टिप्पर पोलिस ठाणे, लोणार येथे जमा करण्यात आले आहे. तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या विशेष मोहिमेदरम्यान नंबर प्लेट नसलेल्या 7 टिप्पर वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात 1 लाख 32 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई सहायक मोटर वाहन निरीक्षक रितेश चौधरी, सुरेखा सपकाळ, अनुजा काळमेघ, प्रियंका काळे यांनी केली.

जिल्ह्यात नदीपात्रातील वाळू मोठ्या प्रमाणावर साठविण्यात आली आहे. अशा अवैध वाळू साठ्याचा शोध तहसिलदार आणि उपविभागीय अधिकारी घेत आहेत. जिल्हाभरात साठविलेली अवैध वाळू जप्त करण्यात येत आहे. या वाळूचा जागीच लिलाव करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande