'आरटीई' प्रवेशाकरिता ५,३८९ अर्ज दाखल
अमरावती, 29 मे, (हिं.स.) - आरटीई प्रवेशाकरिता १२ दिवसांत २ हजार ३९६ जागांकरिता तब्बल ५ हजार ३८९ अर्ज
'आरटीई' प्रवेशाकरिता ५,३८९ अर्ज दाखल


अमरावती, 29 मे, (हिं.स.) - आरटीई प्रवेशाकरिता १२ दिवसांत २ हजार ३९६ जागांकरिता तब्बल ५ हजार ३८९ अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले आहेत. अर्ज करण्याची मुदत ३१ मे ही आहे. त्यामुळे आता अर्ज करण्याकरिता शेवटचे तीनच दिवस शिल्लक राहिले आहे. कारण त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे. पुणे येथे लॉटरी काढल्यानंतर जूनच्या पहिल्याच आठवड्यात प्रत्यक्षात प्रवेशाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

आरटीईची प्रवेश प्रक्रियाआधीच तब्बल दोन महिने उशीरा सुरू झाली. त्यामुळे आता जुन्याच नियमानुसार प्रवेश अर्ज स्वीकारले जात आहे. जिल्ह्यात २३१ शाळांमध्ये २,३६९ जागांकरिता १७ मेपासून अर्जाला सुरुवात करण्यात आली. या १२ दिवसांत ५,३८९ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहे. त्याला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, आधीच प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाल्याने आरटीई प्रवेशाला अधिक वेळ नसल्याने ३१ मेपूर्वीच सर्व अर्ज स्वीकारून जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्षात प्रवेशाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता या प्रक्रियेला मुदतवाढ नसल्याचे पत्र शिक्षण विभागाने शिक्षणाधिकारी यांना पाठविले आहे.

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेच्या कामकाजासाठी गठित केलेल्या पडताळणी समितीने प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणी समितीस पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. याशिवाय पुढील शैक्षणिक वर्षाचे प्रवेश प्रक्रिया जूनमध्ये सुरू होत असल्याने आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेस ३१ मेची डेडलाइन देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांना आता आपल्या पाल्यांच्या प्रवेशाकरिता अर्ज या तीन दिवसांत ऑनलाइन सादर करावे लागणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande