अमरावती - निसर्गाच्या बदलातून बांधला जातो पावसाचा अंदाज
अमरावती, 29 मे, (हिं.स.) - रोहिणी नक्षत्राला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे पेरणीपूर्व नियोजन करून शेतकर
अमरावती - निसर्गाच्या बदलातून बांधला जातो पावसाचा अंदाज


अमरावती, 29 मे, (हिं.स.) - रोहिणी नक्षत्राला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे पेरणीपूर्व नियोजन करून शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत. यंदा पाऊस कसा होईल? किती होईल? याचे आराखडे बांधले जात आहेत. विज्ञानाने हवामानाचा अंदाज बांधण्यात मोठी प्रगती केली असली तरी आजही शेतकऱ्यांनी बांधलेले पारंपरिक अंदाज आश्वासक ठरत आहेत.

पूर्णपणे नैसर्गिक आचरणावर आधारित असलेले अंदाज आजही ग्रामीण भागांत अचूक आणि आश्वासक समजले जातात. पक्ष्यांनी घरटी झाडाच्या टोकावर बांधली की पाऊस कमी, झाडाच्या मध्यावर बांधली की पाऊस मध्यम आणि झाडाच्या खालच्या भागात, झाडांच्या ढोलीत बांधली की पाऊसमान भरपूर होणार, असा एक पारंपरिक अंदाज वर्तविण्यात येतो. कोकिळा आणि पावशा पक्षी घुमू लागला की, लवकरच पाऊस येणार.

बगळ्यांची पांढरी पिसे तपकिरी रंगाची दिसू लागली, तर त्या वर्षी पाऊस भरपूर पडणार, असे अनुमान लावले जातात. ऐन उन्हाळ्यात डोंगरावरील गवत जर हिरवाई दाखवू लागले, तर ते तुफानी पावसाचे संकेत समजले जातात. ज्या वर्षी आंब्याचे भरपूर पीक येते, त्या वर्षी चांगला पाऊस बरसतो. प्राणी, पक्षी व वनस्पतींच्या बदलांवरून पाऊसमानाचा अंदाज पूर्वीपासून लावला जात आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande