लोकसभा निवडणुकीत शिष्टाचाराचे उल्लंघन झाले - सरसंघचालक
नागपूर, 10 जून (हिं.स.) : यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिष्टाचाराचे उल्लंघन झाले. तसेच कृत्
डॉ. मोहन भागवत सरसंघचालक


नागपूर, 10 जून (हिं.स.) : यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिष्टाचाराचे उल्लंघन झाले. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मतदीने खोटेपणा पसरवला गेल्याची घणाघाती टीका सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केली. नागपूरच्या रेशीमबाग येथे कार्यकर्ता विकास वर्ग-2 च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी देशभरातून आलेल्या स्वयंसेवकांना संबोधित करताना डॉ.भागवत म्हणाले की, निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन सरकारही स्थापन झाले. मात्र असे असूनही चर्चा सुरूच आहे. संसदेत पक्ष आणि विरोधक असतात. संसदेत परस्पर सहमती होऊन राष्ट्रहिताचे काम होणे अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांसमोर दुसरी बाजू उघड करणे हे विरोधकांचे काम असते. सर्वसहमतीने देश चालवण्याची जुनी परंपरा आहे. पण निवडणुकीच्या स्पर्धेतून संसदेत पोहोचलेल्या लोकांमध्ये असे एकमत होणे अवघड आहे. त्यामुळे बहुमताचा आधार घेतला जातो. मात्र यावेळच्या निवडणुकीत समाजात ज्या प्रकारे विसंवाद वाढेल, तेढ निर्माण होईल अशी विधाने केली गेली. या देशात प्रक्रियेचा एक भाग म्हणून दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. निवडणूक ही स्पर्धा आहे, युद्ध नाही. मात्र यावेळी निवडणुकीत निकष पाळले गेले नाहीत. एआयसारख्या तंत्रज्ञानाद्वारे समाजात खोटेपणा पसरवला गेला. संघालाही राजकारणात ओढण्यात आल्याचे डॉ. भागवतांनी सांगितले.

एनडीए सरकारचे कौतुक करताना डॉ.भागवत म्हणाले की, देशात पुन्हा एनडीएचे सरकार निवडून आले आहे. सरकारने गेल्या 10 वर्षात अनेक क्षेत्रात चांगली कामे केली आहेत. परराष्ट्र धोरण, संरक्षण, अर्थव्यवस्था आणि आरोग्य क्षेत्रात देशाने प्रगती केली आहे. आम्ही पुढे गेलो आहोत पण आव्हानांपासून मुक्त झालो नाही. प्रगतीसाठी देशातील शांतता अत्यंत आवश्यक आहे. मणिपूर वर्षभरापासून शांततेची वाट पाहत आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे भागवत यांनी सांगितले. संस्कृती आणि सामाजिक जबाबदाऱ्या या विषयावर आपले मत मांडताना सरसंघचालक म्हणाले की, जर चांगल्या घरातील महिला दाऊ पिऊन अपघाताचे कारण बनत असतील, तर यात संस्कृती कुठे आहे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच जो कोणी संस्कृतीचा त्याग करतो त्याची अवस्था वाईट होते असे त्यांनी सांगितले. देशात परिवर्तन घडवायचे असेल तर समाजात बदल घडवावा लागेल. समाज परिवर्तनातूनच व्यवस्था बदलणे शक्य असल्याचे भागवत म्हणाले. यावेळी सरसंघचालकांनी जातीवादावर जोरदार प्रहार केला. लोकांच्या मनातून अस्पृश्यतेची भावना काढून टाकावी, असे आवाहनही त्यांनी केले. समाजात आणि देशात बदल घडवून आणण्यासाठी सरसंघचालकांनी सामाजिक समता, पर्यावरणाचे रक्षण, स्वावलंबी राहणीमान, शिस्त आणि नियमांचे पालन या प्रमुख मुद्दे सांगितले. तसेच काम करताना आपण हे केले, असा अहंकार सोडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande