अमरावती असेल आंध्रप्रदेशची एकमेव राजधानी
हैदराबाद, 11 जून (हिं.स.) : आंध्रप्रदेशातील अमरावती ही राज्याची एकमेव राजधानी असणार आहे. तेलगू देसम
संग्रहित


हैदराबाद, 11 जून (हिं.स.) : आंध्रप्रदेशातील अमरावती ही राज्याची एकमेव राजधानी असणार आहे. तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी आज, मंगळवारी याबाबत घोषणा केली आहे. शपथविधीच्या एक दिवस आधी चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले की, अमरावती ही राज्याची एकमेव राजधानी असेल.

आंध्रप्रदेशातील टीडीपी, भाजप आणि जनसेनेच्या आमदारांच्या संयुक्त बैठकीत विधानसभेतील एनडीए नेते म्हणून एकमताने नायडूंची निवड करण्यात आली. या निवडीनंतर नायडू म्हणाले की,आमच्या सरकारमध्ये 3 राजधान्यांच्या नावाखाली खेळ होणार नाही. आमची राजधानी अमरावती आहे. राज्याच्या विभाजनानंतर अमरावती ही राजधानी आहे. यापूर्वी नायडू यांनी अमरावतीला राजधानी बनवण्याची कल्पना मांडली होती. तथापि, 2019 मध्ये त्यांची सत्ता गमावल्याने नायडू यांच्या कल्पनेला धक्का बसला आणि वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपीने जबरदस्त विजय मिळवला. त्यानंतर रेड्डी यांनी अमरावती शहराच्या योजना रद्द केल्या आणि तीन राजधान्यांची नवीन कल्पना मांडली, ज्याची जागा आता एकच राजधानी ठेवण्याच्या निर्णयाने नायडूंनी घेतली आहे.

आंध्र प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीडीपी, भाजप आणि जनसेना यांच्या युतीचा एकतर्फी विजय झाला. विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला 164 जागा मिळाल्या. तर लोकसभा निवडणुकीत 21 जागांवर प्रचंड बहुमताने विजय मिळवला. या आदेशामुळे अमरावतीला राजधानी बनवण्याच्या योजनेत नवसंजीवनी मिळाली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande