जल पुनर्भरणाने होईल 'जलसमृद्ध गाव'
हल्ली तीव्र उन्हाळ्यात आपण सारेच पाणीटंचाईचा सामना करत आहोत. पिण्याचे, वापराचे पाणी ही तर जीवनावश्यक
जल पुनर्भरणा 


जल पुनर्भरणा 


हल्ली तीव्र उन्हाळ्यात आपण सारेच पाणीटंचाईचा सामना करत आहोत. पिण्याचे, वापराचे पाणी ही तर जीवनावश्यक वस्तू मात्र त्यासाठी कितीतरी खटाटोप करावा लागतो. ही परिस्थिती बदलणे आपल्याच हातात आहे. त्यासाठीचा अत्यंत साधा आणि स्वस्त उपाय म्हणजे जलपुनर्भरण. पावसाळ्यात पावसाचे पाणी वाहून जाते. हे वाहून जाणारे पाणी आपल्या विहीरी, कूपनलिका यांच्याद्वारे भूगर्भात पुन्हा जमा करणे,साठवणे. हा उपाय कमी खर्चिक असून तात्काळ फायदा देणारा असून आपणच आपल्याला लागणारे पाणी जमा करुन साठवून ठेवू शकतो. ह्या उपायाला अभियानाचे स्वरुप देऊन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यंदाच्या पावसाळ्यात हे अभियान राबविण्याचे ठरविले आहे. पाऊस सुरु होण्यास अजून वेळ आहे, तरी त्यापूर्वी जलपुनर्भरणा विषयी जनजागृती व्हावी यासाठी सोबतच्या लेखात माहिती दिली आहे.

पावसाळ्याच्या दिवसात विहिरीत भूजल पुनर्भरण केल्याने ज्या जलस्तरातून पाणी उपसले गेल होते त्या जलस्तरात पावसाचे पाणी साठवले जाते.अशाप्रकारे पाणी भरलेल्या विहिरीच्या सर्वात जास्त खोलवर असलेल्या थरात भूजलसाठा पूर्ववत होऊ शकतो. याचबरोबर कूपनलिकेद्वारेही भूजल पुनर्भरण शक्य आहे.

अलीकडच्या काळात भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने भूजल पातळी खालावत आहे. भूजलाच्या शोधात प्रत्येक शेतकरी विहिरी दरवर्षी खोल करताना दिसतात. याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याचा उपसा होण्याचे प्रमाण हे जमिनीत मुरणाऱ्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. याचा परिणाम म्हणून भूजल पातळी खोलवर जात आहे. वर्षभर पाण्याच्या उपलब्धतेसाठी भूजल पातळी स्थिर राहणे गरजेचे आहे. त्या करीता अतिउपाशावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. याचबरोबर भूजल पातळी स्थिर राहण्याकरीता दुसरा उपाय म्हणजे भूजल पुनर्भरण.

नैसर्गिक जलपुनर्भरण

जमिनीमध्ये अनेक वेगवेगळे व भिन्न थर आढळतात. या थराची जाडी, आकारमान वेगवेगळे आहेत. पहिला थर मातीचा. या थरातून पाणी मुरण्याचा वेग दर दिवसाला साधारणपणे दोन सें.मी. असतो. मुरुमाच्या थरातून पाणी वाहनाचा हाच दर 10 से.मी. असू शकतो. ज्या खडकांना भेगा, फटी, सळ व सूक्ष्म छिद्रे असतात त्या खडकातून पाणी वहनाचा हाच दर 200 से.मी. इतका असू शकतो. एकंदर पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यापासून भूजलसाठ्यापर्यंत पोहोचण्यास साधारणपणे एक महिना किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागतो. म्हणजेच नैसर्गिक भूजल भरणाचा वेग फार कमी आहे. हेच पुनर्भरण जलद होण्यासाठी विहीर पुनर्भरण हा एक महत्त्वाचा उपाय आहे.

भूजल पुनर्भरणाचे उपाय

भूजल पुनर्भरण वेगवेगळ्या उपायांनी करता येते. शेततळी (अस्तर नसलेली), पाझर तलाव, बंधारे, पुनर्भरण चर आणि विहिर पुनर्भरण हे त्यापैंकी काही प्रमुख उपाय आहेत. शेततळी, पाझर तलाव, बंधारे तथा पुनर्भरण चर हे भूजल पुनर्भरणचे उत्तम उपाय होत.

असे करा विहीर पुनर्भरण

पावसाचे पाणी विहीरीत सोडणे म्हणजेच विहीर पुनर्भरण होय. यासाठी ओढा किंवा नाल्यातून वाहणारे पावसाचे पाणी, पावसाचा अपधाव यांचा वापर करता येतो. पावसाळयात विहीर भरल्याने विहीरीतील पाणी जमिनीत खोलवर मुरेल. ज्या जलस्तरातून पाणी उपसले गेले होते. त्या जलस्तरात विहिरीतील पाणी शिरते. पावसाळ्याच्या संपूर्ण हंगामात अशा प्रकारे पाणी भरलेल्या विहिरींच्या सर्वात जास्त खोलवर असलेल्या थरात भूजलसाठा पूर्ववत होऊ शकतो. विहिरीत गाळ मिश्रित पाणी भरल्यास आणि विहिरीत गाळ असल्यास ज्या सूक्ष्म भेगांतून, छिद्रातून गाळयुक्त पाणी जलस्तरात वाहताना गाळामुळे ती छिद्रे, भेगा, फटी बंद पडण्याचा दाट धोका निर्माण होतो व ही छिद्रे बंद पडली तर विहीर बंद पडू शकते. म्हणून गाळविरहित पाणी विहिरीत सोडणे अत्यंत महत्वाचे आहे.

विहीर पुनर्भरणाची पद्धत

1. विहीर व ओढ्याच्या अंतरामध्ये तीन मीटर व दोन मीटर लांबीचे दोन स्वतंत्र खड्डे घ्यावेत.

2. पहिला खड्डा तीन मीटर लांब, तीन मीटर रुंद व एक मीटर खोल घ्यावा.

3. दुसरा खड्डा पहिल्या खड्डयापासून तीन मीटर अंतरावर घ्यावा.

4. दुसरा खड्डा दोन मीटर लांब, 1.5 मीटर रुंद व दोन मीटर खोल घ्यावा.

5. पहिल्या खड्डयाच्या मध्यभागी एक आडवे छिद्र घेऊन हा खड्डा पी.व्ही.सी. सहा इंची पाइपद्वारे दुसऱ्या खड्डयास जोडावा.

6. पहिला खड्डा दगड गोट्यांनी भरावा.

7. दुसऱ्या खड्याच्या तळाशी 0.45 मीटर जाड खडीचा थर भरावा. त्या थरावर 0.45 मीटर जाडीचा वाळूचा थर भरावा. त्यानंतर 0.45 मीटर जाडीचा बारीक वाळूचा थर भरून त्यावर 0.45 मीटर जाडीचा कोळशाचा थर भरून घ्यावा. हा खड्डा तळापासून चार इंची पी.व्ही.सी. पाईपद्वारे विहिरीशी जोडावा.

8. ओढ्यातील पाण्यामधील पालापाचोळा, कचरा इत्यादी तीन मीटर लांब, तीन मीटर रुंद व एक मीटर खोल खड्डयात स्थिरावतील आणि कण विरहित पाणी पाइपद्वारे दोन मीटर लांब, 1.5 मीटर रुंद व दोन मीटर खोल खड्डयात जाईल.

9. दुसऱ्या खड्डयातून गाळलेले स्वच्छ पाणी विहिरीत पाइपद्वारे जाऊन विहीर पुनर्भरण होईल.

विहीर पुनर्भरणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या अधिक कार्यक्षमता असलेल्या चार थरांच्या गाळण यंत्रणेचा वापर करावा.

कूपनलिकेद्वारे भूजल पुनर्भरण

पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडणे म्हणजेच कूपनलिका पुनर्भरण होय.

1. कूपनलिकेजवळ नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे.

2. कूपनलिकेच्या सभोवताली दोन मीटर लांब, दोन मीटर रुंद व दोन मीटर खोल आकाराचा खड्डा खोदावा.

3. खड्डयातील उंची एवढया केसिंग पाइपच्या भागात एक-दोन सें.मी. अंतरावर सर्व बाजूने चार-पाच मि.लि. व्यासाची छिद्रे पाडावीत.

4. या छिद्रावर नारळदोरी (काथ्या) घट्ट गुंडाळावी.

5. खड्डयाचे चार भागांत विभाजन करुन सर्वात खालच्या भागात दगडगोटे, त्यावरच्या भागात खडी नंतरच्या भागात वाळूची चाळ व सर्वात धुतलेली वाळू भरावी.

6. अशाप्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाईल आणि कूपनलिकेचे पुनर्भरण होईल.

पुनर्भरण करतांना घ्यावयाची खबरदारी

1. ओढयाला येणारे पाणी हे क्षार व रसायनविरहित असावे.

2. पाणी तळापर्यंत पाइपद्वारे पोचवावे.

3. पुर्नभरणापूर्वी दोन गाळणी खड्डे असावेत.

4. पुर्नभरणापूर्वी विहिरीतील गाळ काढून टाकावा.

5. पुनर्भरण हे गाळलेल्या व स्वच्छ पाण्यानेच करावे.

6. ज्या क्षेत्रावर मीठ फुटले असेल म्हणजेच क्षार जमा झाले असतील, त्या क्षेत्रातील पाणी विहीर पुर्नभरणास वापरु नये.

7. औद्योगिक क्षेत्रातील पावसाचे पाणी पुनर्भरणास वापरु नये.

8. साखर कारखाना परिसरात जेथे मळी जमिनीवर पसरली जाते, त्या भागातील पाणी वापरु नये.

9. सूक्ष्म जिवाणूजन्य तथा रोगराई स्थित क्षेत्रातील पाणी वापरू नये.

10. वाळू, गोटे यांचा वापर करुन तयार केलेली गाळणी पावसाळयापूर्वी एकदा स्वच्छ करावी.

माहिती स्रोतः जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर

माहिती संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande