छतावरचे पाणी देई 'जलसमृद्धी'
तापमान वाढीचे चटके, पाणी टंचाईने कोरडे झालेले घसे यांच्यासह ‘नेमेची येतो पावसाळा…’ म्हणत पुन्हा एकद
छतावरचे पाणी देई 'जलसमृद्धी'


तापमान वाढीचे चटके, पाणी टंचाईने कोरडे झालेले घसे यांच्यासह ‘नेमेची येतो पावसाळा…’ म्हणत पुन्हा एकदा पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहोत. भर उन्हात पाण्याच्या टॅंकरची तिष्ठत प्रतिक्षा करणारे आपण; पावसाच्या जलधारांमध्ये चिंब भिजतांना सोसलेली पाणी टंचाई अशीच विरघळून जाऊ देणार आहोत का? याचे उत्तर नकारार्थी असेल तर आत्ताच वेळ आहे… उठा आणि कामाला लागा. इकडे तिकडे कुठंही जाण्याची गरज नाही. आपल्याच घराच्या छतावर पडून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवा. एरवी हे वाहून जाणारे पाणीच तुम्हा आम्हाला आणि पर्यायाने आपापल्या गावाला ‘जलसमृद्धी’ देणार आहे हे निःसंशय.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पाणीटंचाई निवारणार्थ यंदा पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी गावांतील विहीरी, बोअरवेल मध्ये साठवून जलपुनर्भरण करण्यासाठी ‘जलसमृद्ध गाव अभियान’ राबविण्याचे नियोजन केले आहे. यंदा जिल्ह्यात उन्हाळ्याच्या अखेरीस पाण्याची टंचाई भासली. या टंचाईच्या निवारणार्थ टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. ही वेळ पुन्हा येऊ नये आणि ‘पाण्यासाठी दाही दिशा’ अशी अवस्था होऊ नये यासाठी आत्ताच नियोजन करुन जलसमृद्ध गाव अभियानासाठी काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी जलपुनर्भरण, पर्जन्यजल साठवण या सोप्या उपाययोजनांची माहिती या लेखाद्वारे देत आहोत.

पावसाळ्यात डोळ्यादेखत पूराचे पाणी वाहून जातांना बघणे आणि उन्हाळ्यात डोळ्यात पाणी आणून पाणी टंचाई पाहणे; ही परिस्थिती आज आपणा साऱ्यांवर आली आहे. एप्रिल महिन्यापासून तापमान वाढत आहे. भूजलपातळी खूप खोल गेल्यामुळे कूपनलिका व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्यासाठी विंधन विहिरी तीनशे फूट खोल घेऊनसुद्धा पाणी लागत नाही. ही विपर्यस्त स्थिती टाळण्यासाठी भूजल पुनर्भरण हा रामबाण उपाय आहे.

पर्जन्यजल साठवण (Rain Water Harvesting) ही जलसंधारणाची एक अत्यंत साधी, सोपी व स्वस्त उपाययोजना आहे. पावसाचे पाणी जे एरवी वाहून जाते, ते अडवून जमिनीत मुरविण्याच्या अनेक उपाययोजना आहेत. आपल्या घरच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी एकत्र करण्यासाठी छपराच्या टोकाला अर्धनळी किंवा पन्हळ जोडून त्याद्वारे वाहत्या पाण्याला वाट देऊन पाईपद्वारे पाणी साठवण टाकी व तेथून गाळून हे पाणी विहीरी, कुपनलिका इ. मध्ये साठवून भूजल साठ्यात जमा केले जाते.

थोडा इतिहास…

अशा प्रकारे पर्जन्यजल साठविण्याची पद्धत फार प्राचीन काळापासून जलटंचाई प्रदेशात प्रचलित असल्याचा उल्लेख आढळतो. इ.स.पू. ३०० पासून बलुचिस्तान,अफगाणिस्तान, इराण आणि भारतामधील कच्छ, राजस्थानचा भाग या प्रदेशात या पद्धतीने पाणी संकलित करुन साठवून वर्षभर वापरण्याची प्रथा असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर भारतात प्राचीन काळात इ.स. १०११ ते १०३७ दरम्यान तमिळनाडू राज्यातील कडलोर जिल्ह्यात पर्जन्यजल साठविण्यासाठी जलकुंभ बांधल्याची नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येक गड किल्ल्यावर याच पद्धतीने खडकात टाके करुन त्यात पावसाचे पाणी साठवून हेच पाणी विहीरीतून वर्षभर उपयोगात आणल्याचे दिसून येते. अनेक गडकिल्ल्यांवर या उपाययोजना आजही अस्तित्वात असल्याचे पहावयास मिळते. तमिळनाडू राज्यात प्रत्येक घरागणिक पर्जन्यजल साठवण अनिवार्य केल्यामुळे गेल्या पाच वर्षांत तेथे पाणीटंचाईवर मात करुन चेन्नईमध्ये पर्जन्यजल पातळीत ५०% वाढ झाली आहे.

उपयुक्तता

पर्जन्यजल साठविल्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढते शिवाय त्या प्रदेशातील जलसुरक्षा स्थितीत सुधारणा होते. पाणी टंचाईच्या काळात हा हमखास उपाय होय. एरवी पडणारा पाऊस जमिनीवरुन वाहून जातो. मात्र, ह्या पद्धतीने वाहणारे पर्जन्यजल अडवून साठविल्याने ते जमिनीत पाझरते व भूजल पातळीत वाढ होते. पर्जन्यजल वाहून जाण्यास प्रतिबंध घातला जात असल्याने मातीचे कण वाहून जाण्यावर नियंत्रण येते व मृदा संधारणास मदत होते. पर्जन्यजल साठवून त्यावर संस्करण केल्यास ते पिण्यासाठीही वापरता येते. याशिवाय हे जल उद्योग, सिंचन, इतर घरगुती वापरासाठी, स्वच्छतेसाठी व बागकामासाठी वापरता येते.

कसे करावे जलपुनर्भरण

घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पन्हाळी द्वारे अथवा पाईपाद्वारे एकत्र संकलित करावे. हे पाणी एका साठवण टाकीत घ्यावे तेथे त्यातील घाण कचरा, गाळ इ. स्थिरावल्यावर त्यातून हे पाणी गाळण टाकीत घ्यावे ह्या गाळण टाकीत दगड, वाळू, खडी व विटांचे तुकडे ह्यांच्या थरातून पाणी गाळले जाऊन ते विहीरीत अथवा बोअरवेल मध्ये सोडावे. जेणे करुन हे पाणी थेट रिक्त झालेल्या भुजल साठ्यात जमा होते.

पाण्याचे मोजमाप

अशा पद्धतीने आपण किती पाणी जमा करु शकतो किंवा ते जमिनीत मुरवू शकतो? ह्याचे साधे सुत्र आहे. वार्षिक सरासरी पाऊस X छपराचा जलधाव गुणांक X छपराचे क्षेत्रफळ = साठणारे एकूण पाणी. अशा प्रमाणात आपण पाणी जमा करुन ते साठवू शकतो, ते ही अगदी विनासायास. आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७३४ मिमी आहे. सिमेंटच्या छताचा जलधाव गुणांक हा ०.७ इतका असतो. तेव्हा आपण १०० चौ. मिटर क्षेत्रफळ असलेल्या भागात पडणारे पावसाचे पाणी साठवून तब्बल ५१ हजार लिटर्स हून अधिक पाणी साठवू शकतो.

हे पाणी जमिनीत जिरवल्यास तितका भूजल साठा वाढवू शकतो. ही उपाययोजना प्रत्येक घरातून झाल्यास किती पाणी गोळा होईल? याची कल्पना केलेली बरी. मात्र ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी गरज आहे ती कृतीची आणि वेळ आहे आत्ताच!

माहितीस्त्रोतः

१. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर

२. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भुजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा, छत्रपती संभाजीगर.

३. मराठी विश्वकोष

- डॉ. मिलिंद मधुकर दुसाने

जिल्हा माहिती अधिकारी

छत्रपती संभाजीनगर.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande