जळगाव, २५ लाख ४२ हजाराच्या चोरीचा छडा, सहा आरोपींना अटक
जळगाव, 1 नोव्हेंबर (हिं.स.)भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकत्याच झालेल्या २५ लाख ४२ हजार रुपयांच्या सनसनाटी दरोड्याचा गुन्हा भुसावळ पोलिसांनी केवळ ४८ तासांच्या विक्रमी वेळेत उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना गजाआड केले असून
जळगाव, २५ लाख ४२ हजाराच्या चोरीचा छडा, सहा आरोपींना अटक


जळगाव, 1 नोव्हेंबर (हिं.स.)भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकत्याच झालेल्या २५ लाख ४२ हजार रुपयांच्या सनसनाटी दरोड्याचा गुन्हा भुसावळ पोलिसांनी केवळ ४८ तासांच्या विक्रमी वेळेत उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना गजाआड केले असून, त्यांच्याकडून तब्बल २३ लाख ४२ हजार रुपयांची रोख रक्कम आणि तीन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण कटाचा सूत्रधार फिर्यादी व्यक्तीच्याच कंपनीतील ड्रायव्हर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या जलद व प्रभावी कारवाईबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ​

‘रॉयल कंपनी’त कार्यरत असलेले फिर्यादी मोहम्मद यासीन इस्माईल हे रात्री सुमारे साडेदहा वाजता कंपनीतील २५.४२ लाख रुपयांची रोकड मोटारसायकलवरून घेऊन घरी जात होते. खडके शिवारातील सत्यसाईनगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर तीन अनोळखी हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाला धडक देऊन त्यांना पाडले आणि त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. ​गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. तपासामध्ये पोलिसांचा संशयाचा काटा फिर्यादीचे ड्रायव्हर शाहीद बेग इब्राहिम बेग (वय २५, रा. भुसावळ) याच्याकडे वळला. कसून चौकशी केल्यावर त्यानेच हा दरोड्याचा कट रचल्याची कबुली दिली. त्यानेच साथीदारांना पैसे घेऊन जाण्याच्या वेळेची अचूक माहिती पुरवून ‘टीप’ दिली होती. ​शाहीद बेगने अकाऊंटंट यासीन शेख यांच्याकडे रोकड असल्याची माहिती मुजाहीद आसीफ मलीक (वय २०) आणि मोहम्मद दानिश मोहम्मद हाशीम (वय १९) यांना दिली. या दोघांनी पुढे हा कट अजहर फरीद मलक (वय २४), अमीर खान यूनुस खान (वय २४) आणि इंजहार बेग इरफान बेग (वय २३) – (रा. रसलपूर, ता. रावेर) यांना सांगितला. गुन्ह्याच्या रात्री शेवटच्या तिघांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन फिर्यादीकडून रोकड लुटली. ​पोलिसांनी आरोपींकडून २३ लाख ४२ हजार रुपयांची रोकड जप्त केली असून, उर्वरित रकमेचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सर्व आरोपींना ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे. ​तपासात उघड झाले की, मुख्य आरोपी शाहीद बेग याच्यावर मलकापूर शहर, बोराखेडी आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये केबल चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तर अमीर खान याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा यापूर्वीच नोंद आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande