अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान; अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर-आ.गावित
धुळे, 1 नोव्हेंबर (हिं.स.) साक्री तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने सोयाबीन, मका, भात, कांदा, बाजरी, पपई, केळी यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, स
अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान; अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर-आ.गावित


धुळे, 1 नोव्हेंबर (हिं.स.) साक्री तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने सोयाबीन, मका, भात, कांदा, बाजरी, पपई, केळी यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुमारे ३४० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, साक्री तालुक्यातील या नुकसानीचा सविस्तर अहवाल आ.सौ. मंजुळा गावित यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना सादर केले आहे. शेतकर्‍यांना तत्काळ पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अवकाळी पावसामुळे शेतातील शेवटच्या टप्प्यातील शेतीकामे रखडली आहेत. अनेक शेतकर्‍यांनी शेतात काढणीसाठी ठेवलेले सोयाबीन आणि मका हे पिक पाण्याने भिजल्याने गुणवत्तेत घट झाली आहे. व्यापार्‍यांकडून असे ओले धान्य खरेदी करण्यास नकार दिला जातो किंवा अत्यल्प दर मिळतो. त्यामुळे शेतकर्‍यांना मजुरी, खते, बियाणे व मशागतीवरील खर्च सुद्धा भरून निघण्याची शक्यता कमी आहे पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या केळी, पपईसह भात आणि ज्वारीच्या पिकांवर पाणी साचल्याने ती पिके पिवळी पडू लागली आहेत. शेतात साठवलेला माल भिजल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान अधिकच वाढले आहे. हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून, अनेकजण कर्जबाजारी होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. वारंवार होणार्‍या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी कुटुंब हवालदिल झाले असून ते शासनाच्या मदतीची वाट पाहत आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने मदत जाहीर करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आ. मंजुळा गावित यांनी मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांकडे केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande