
रायपूर, 01 नोव्हेंबर (हिं.स.) : छत्तीसगडशी अतिशय आत्मीय संबंध असून हे राज्य नक्षली हिंसाचारातून समृद्धीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आगामी 2047 पर्यंत विकसित भारताच्या निर्मित्तीचे उद्दिष्ट असून यात छत्तीसगडची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. छत्तीसगड विधानसभेच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी आज, शनिवारी ते बोलत होते.
याप्रसंगी मोदी म्हणाले की, छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण हा “ऐतिहासिक क्षण” आहे. छत्तीसगडच्या गेल्या 25 वर्षांच्या प्रवासातील परिवर्तनाचे साक्षीदार राहणे ही त्यांच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.आपल्या कार्यकर्ता काळातील आठवणींना उजाळा देत मोदी म्हणाले की, त्यांनी छत्तीसगडमध्ये दीर्घ काळ घालवला आणि तेथून खूप काही शिकलो. त्यांनी संविधान सभेचे सदस्य राहिलेले राज्याचे महान नेते — रवी शंकर शुक्ल, बॅरिस्टर ठाकुर छेदीलाल, घनश्यामसिंह गुप्त, किशोरी मोहन त्रिपाठी, रामप्रसाद पुताई आणि रघुराज — यांना श्रद्धांजली वाहिली.त्यांनी सांगितले की, या विभूत्यांनी आपल्या पिछडलेल्या प्रदेशांतून दिल्लीपर्यंत पोहोचून बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संविधान निर्मितीत मोलाचे योगदान दिले.
पंतप्रधानांनी राष्ट्रभावनेचा उल्लेख करत म्हटले की, आज देश वारसा आणि विकास या दोन्ही गोष्टींचे संगोपन करत पुढे जात आहे. त्यांनी संसद भवनातील पवित्र सेंगोलचा संदर्भ देत सांगितले की, नव्या संसद भवनाच्या गॅलऱ्या भारताच्या लोकशाहीच्या प्राचीनतेचे प्रतीक आहेत.त्यांनी समाधान व्यक्त केले की, छत्तीसगडच्या नव्या विधानभवनातही तीच भावना आणि सांस्कृतिक वारसा झळकतो आहे.मोदी यांनी छत्तीसगडच्या 25 वर्षांच्या परिवर्तनाला “अद्भुत आणि प्रेरणादायी” असे वर्णन केले. ते म्हणाले .
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, भारत आता नक्षलवाद आणि माओवादी दहशतवादाच्या निर्मूलनाकडे वाटचाल करत आहे.ते म्हणाले की, “आज बस्तर ऑलिंपिक” देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. या परिवर्तनाचे श्रेय त्यांनी छत्तीसगडच्या जनतेच्या परिश्रमाला आणि भाजप सरकारच्या दूरदर्शी नेतृत्वाला दिले.त्यांनी बस्तरच्या पारंपरिक “मुरिया दरबार”चा उल्लेख करत सांगितले की, छत्तीसगडमध्ये समाज आणि शासन मिळून समस्यांचे निराकरण करण्याची परंपरा आहे.पंतप्रधानांनी छत्तीसगडच्या रजत जयंती उत्सवाला नवा प्रारंभबिंदू म्हटले. त्यांनी सांगितले की, 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या प्रवासात छत्तीसगडची भूमिका अतिशय मोठी असेल असा विश्वास व्यक्त केला.
“छत्तीसगड विकसित, भारताचा विकास.”
मोदी म्हणाले की, नव्या विधानसभेचे श्रेष्ठत्व तिच्या भव्यतेत नसून जनकल्याणासाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमध्ये आहे.त्यांनी आमदारांना आवाहन केले की, प्रत्येक निर्णयाचा केंद्रबिंदू शेतकरी, युवक, महिला शक्ती आणि अंत्योदय असावा.ते म्हणाले की, “विधानसभा हे फक्त कायदे बनविण्याचे ठिकाण नाही, तर छत्तीसगडच्या भविष्यनिर्मितीचे केंद्र आहे.त्यांनी सर्वांना कर्तव्य सर्वोपरि ठेवण्याचा आणि जनतेच्या सेवेला जीवनाचे ध्येय बनवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
मोदी यांनी मुख्यमंत्री व विशेषतः डॉ. रमन सिंह यांचे या कल्पनेला साकार रूप दिल्याबद्दल आभार मानले आणि लोकशाहीच्या या नव्या मंदिराच्या लोकार्पणाबद्दल शुभेच्छा दिल्या.
नवा रायपूरच्या सेक्टर-19 मध्ये झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आणि ‘मां के नाम एक पेड़’ लावला.
या वेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यपाल रमेन डेका, मुख्यमंत्री विष्णुदेव साय, विरोधी पक्षनेते डॉ. चरणदास महंत आणि विधानसभा अध्यक्ष डॉ. रमन सिंह उपस्थित होते.डॉ. रमन सिंह म्हणाले की, “या विधानभवनाच्या बांधकामात राज्यातील सामग्रीचे 80 टक्के योगदान आहे प्रत्येक विटेत छत्तीसगडची ओळख आहे. यावेळी मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी भारताला अकराव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आणले आहे. ते कोणालाही उगाच छेडत नाहीत, पण जो छेडतो त्याला सोडतही नाहीत.लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपल्या भाषणाची सुरुवात “जय जोहार” या पारंपरिक अभिवादनाने केली. त्यांनी सांगितले की, विधानभवनाचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या करकमलाने होत आहे, ही गौरवाची बाब आहे.------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी