बोगस-दुबार मतदार प्रकरणात न्यायालयात जाणार - उद्धव ठाकरे
मुंबई, 1 नोव्हेंबर (हिं.स.) - ही विरोधी पक्षांची एकजूट नाही. तर लोकशाहीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्यांची एकजूट आहे. आम्ही लोकशाही मार्गाने यांना ठोकण्यासाठी तयार आहोतच, पण आता जनतेनेही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर लोकशाही
उद्धव ठाकरे


मुंबई, 1 नोव्हेंबर (हिं.स.) - ही विरोधी पक्षांची एकजूट नाही. तर लोकशाहीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्यांची एकजूट आहे. आम्ही लोकशाही मार्गाने यांना ठोकण्यासाठी तयार आहोतच, पण आता जनतेनेही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचा खून होत आहे. त्यामुळे हे जे काही चाललं आहे, ते थांबवलं पाहिजे. मतचोरी करणाऱ्यांना सांगतो आज ठिणगी बघत आहात. या ठिणगीची आग कधी होईल सांगता येत नाही. तुमच्या बुडाला लागेल. बोगस आणि दुबार मतदारांचे सगळे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत, आता न्यायालयाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

मतदार याद्यांमधील घोळ, मतचोरी या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि मनसे यांच्या वतीने मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढण्यात आला होता. हा मोर्चा फॅशन स्ट्रीट, मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर येऊन थांबला. या मोर्चात काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट यांच्यासह माकप, भाकप, शेकाप, मनसे आणि इतर संघटना सहभागी झाल्या होत्या.

ठाकरे पुढे म्हणाले की, आज एवढे सगळे धडधडीत पुरावे दाखवले, तरीही निवडणूक आयोग त्यावर काहीही कारवाई करत नाही. आपले पक्ष चोरले, नाव चोरले... तेवढंही पुरेसं नाही म्हणून आता मतदारही चोरले जात आहेत. शोलेत एक डायलॉग आहे. दूर गाव में बच्चा रोता है तो मां कहती है, सोजा नही तो गब्बर आयेगा. तसं सांगतो, सावध राहा. नाही तर अॅनाकोंडा येईल. राजने डोंगरच उभा केला. तरीही निवडणूक आयोग ऐकत नाही. निवडणूक आयोग यांचे नोकर आहे. मी अॅनाकोंडा का म्हणतोय. यांची भूक थांबत नाही. आपला पक्ष, निशाणी चोरली. वडील चोरत आहेत. ते पुरत नाही म्हणून मतदान चोरी करत आहेत. सर्व आले. पण सत्ताधारी आले नाही.

आता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांनेही जागं झालं पाहिजे. त्यामुळे मतचोर ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला फटकवा. मनसे आणि महाविकास आघाडीकडून मुंबईत निवडणूक आयोगाच्या मतदारयादीतील भ्रष्टाचाराविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो, आजही महाराष्ट्र एकवटला आहे. ज्या गोष्टी आता आम्ही विरोधी पक्ष करत आहोत, तसंच सगळ्या मतदारांनीही जागृत व्हावं आणि मतदार याद्या तपासा. आपलं नाव त्यामध्ये आहे की नाही हे तपासा आणि तुमच्या घराच्या पत्त्यावर तुम्हाला माहिती नसलेले किती मतदार आहेत ते तपासा, असे आवाहनही ठाकरेंनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande