
जळगाव, 12 नोव्हेंबर (हिं.स.)यावल तालुक्यातील दुसखेडा ते थोरगव्हाण रस्त्यावरील मांगी–रिधुरी फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात करंजी येथील २४ वर्षीय तरुण शेतकरी विजय विनोद कोळी याचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा घटनास्थळीच करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विजय कोळी हा सकाळच्या सुमारास आपल्या (एमएच-१९ डीजे-४६९४) या दुचाकीवरून बोरावल येथे आत्याची भेट घेण्यासाठी निघाला होता. मात्र दुसखेडा–थोरगव्हाण मार्गावर मांगी–रिधुरी फाट्याजवळ आल्यानंतर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत विजयच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती प्रवाशांनी तात्काळ फैजपूर पोलिसांना दिली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील व रवींद्र मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलविला. या प्रकरणी सचिन सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, विजय कोळी यांच्या आकस्मिक निधनाने करंजी गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि केवळ चार महिन्यांची कन्या असा परिवार आहे. तरुण वयातच संसाराचा आधार हरपल्याने कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर