
चंद्रपूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।
चंद्रपूर महानगरपालिकेतील उपायुक्त मंगेश खवले यांची बदली होऊन ते नागपूर महानगरपालिका उपायुक्तपदी रुजू झाले आहेत. त्यांच्या बदलीनिमित्त चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी भावपूर्ण निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
मंगेश खवले यांनी जुलै २०२३ मध्ये चंद्रपूर महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांच्या कार्यकाळात त्यांना देण्यात आलेल्या एकूण १४ विभागांची जबाबदारी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली. प्रशासकीय कामकाजात कार्यकुशलता, वेळेचे भान आणि निर्णयक्षमता यामुळे त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास व प्रेरणा निर्माण केली. त्यांच्या कार्यकाळात स्वच्छता अभियान, नागरी सुविधा, कर वसुली, पायाभूत सुविधा सुधारणा, तसेच जनसंपर्क विभागातील सुधारणा अशा विविध उपक्रमांना गती मिळाली.
निरोप समारंभात आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त संदीप चिद्रवार, मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी, शहर अभियंता रवींद्र हजारे, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, नगर सचिव नरेंद्र बोबाटे, सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, सहायक आयुक्त अनिलकुमार घुले यांच्यासह मनपाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या मनोगतातून खवले यांच्या नेतृत्वशैलीचे आणि सौजन्यपूर्ण वर्तनाचे विशेष कौतुक केले. सर्वांना सोबत घेऊन काम करणारे आणि नेहमी प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख कायम राहील, असे मनोगत अनेकांनी व्यक्त केले.
उपायुक्त मंगेश खवले यांनी आपल्या भाषणात चंद्रपूर महानगरपालिकेत काम करताना आले अनुभव हा उत्तम होता व येथे मिळालेलं सहकार्य, टीमवर्क आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोन नागपूर मनपातही घेऊन जाणार असल्याचे सांगितले तसेच सर्व सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि आयुक्तांचे आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव