
रायगड, 12 नोव्हेंबर (हिं.स.) : श्रीवर्धन शहराबाहेरील वाळवटी मार्गावरील पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत असूनही या पुलावरून अवजड आणि अती अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. जीवना जेटी परिसरात सुरू असलेल्या कामासाठी मोठमोठे दगड आणि बांधकाम साहित्य या पुलावरून नेले जात असल्याने पुलाच्या स्थैर्याबाबत गंभीर शंका उपस्थित झाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाला “धोकादायक” असा फलक लावूनही कोणतीही देखभाल किंवा वाहतुकीवरील निर्बंध लावलेले नाहीत. पुलाखालील गारगोटी आणि लोखंडी रॉड उघडे पडले असून, काँक्रीटचे थर सैल झाले आहेत. अशा परिस्थितीत दररोज ट्रक, डंपर, जेसीबी यांसारखी वाहने या मार्गावरून जात असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
या पुलावरून दररोज शालेय वाहनांसह शेकडो नागरिकांची ये-जा होते. जर पूल कोसळला तर श्रीवर्धन वाळवटी भागासाठी कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांनी या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असूनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
नागरिकांनी प्रशासनाला तातडीने या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करून पुलाची दुरुस्ती अथवा नव्याने बांधकाम करण्याची मागणी केली आहे. “पूल कोसळल्यानंतर उपाय शोधण्यापेक्षा आधीच सुरक्षा उपाय करावेत,” असे नागरिकांचे मत असून, या विषयावर आता जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक झाले आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके