



नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। भारत - आफ्रिका मंच शिखर परिषदेअंतर्गत आफ्रिकेसोबतची आपल्या भागीदारीचा विस्तार करण्यासाठी तसेच बोत्सवानासोबतचे संबंध अधिक अधिक दृढ व्हावेत यादृष्टीने काम करण्याकरता, भारत वचनबद्ध असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी सांगितले.
राष्ट्रपती 11 नोव्हेंबर रोजी बोत्सवानाची राजधानी गॅबोरोन येथे पोहोचल्या. अंगोला आणि बोत्सवाना दौ-यामधील, त्यांच्या भेटीचा हा अंतिम टप्पा असणार आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी बोत्सवानाला दिलेली ही पहिलीच भेट आहे. जलशक्ती तसेच रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना, खासदार प्रभूभाई नागरभाई वसावा आणि डी. के. अरुणा हे देखील या दौऱ्यात राष्ट्रपतींसमवेत गेले आहेत.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज गॅबोरोन मधील राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी बोत्सवाना प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष ॲडव्होकेट डुमा गिडीऑन बोको यांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले.
लोकशाहीची जननी असलेला भारत हा बोत्सवानाच्या विकासाच्या वाटचालीतील प्रेरणेचा स्त्रोत असून, भारत हा कायमच बोत्सवानाला पाठिंबा देत असल्याची भावना बोत्सवानाचे राष्ट्राध्यक्ष बोको यांनी व्यक्त केली. शिक्षण, लिंगभाव समानता आणि उपेक्षित लोकांच्या उत्थानासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी बजावलेल्या सक्रिय भूमिकेची प्रशंसाही त्यांनी केली. आपण गेल्या वर्षी पदभार स्वीकारल्यापासून बोत्सवानाने बाहेरच्या देशाच्या राष्ट्रपतींची आयोजित केलेली ही पहिलीच भेट आहे. तसेच भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध बोत्सवानासाठी किती महत्त्वाचे आहेत, याचेच हे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रपती द्रौपती मुर्मु यांच्या या भेटीत काही थेट व्यक्ती ते व्यक्ती बैठका तसेच शिष्टमंडळ स्तरीय चर्चाही झाल्या. या बैठका आणि चर्चांमधून दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, कृषी, नवीकरणीय ऊर्जा, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, संरक्षण आणि डिजिटल तंत्रज्ञान यासह प्रमुख क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वृद्धींगत करण्यावर सहमती दर्शवली.
भारताच्या राष्ट्रपतींनी बोत्सवानाला दिलेली ही आजवरची पहिलीच भेट असल्याने, या भेटीमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांनी एक महत्त्वाचा ऐतिसाहिक टप्पा गाठला असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यावेळी म्हणाल्या. 2026 मध्ये दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना 60 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवरही ही भेट महत्वाची ठरली असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘चीता प्रकल्पा’च्या पुढच्या टप्प्याअंतर्गत बोत्सवाना, भारतातील चित्त्यांचे अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी मदत करणार आहे. बोत्सवानाच्या या सहकार्याचा दखलपूर्ण उल्लेखही राष्ट्रपतींनी केला, आणि त्याबद्दल आनंदही व्यक्त केला. हा भारताचा एक महत्वाचा वन्यजीव संवर्धन उपक्रम आहे, भारतातील वन्यजीव परिसंस्थेत पुन्हा एकता चित्त्यांचे अस्तित्व निर्माण करणे हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडील चित्ते भारतात पाठवण्यासाठी संमती दिल्याबद्दल त्यांनी राष्ट्राध्यक्ष बोको आणि बोत्सवानाच्या नागरिकांचे आभारही मानले.
यावेळी दोन्ही नेत्यांनी औषधकोषासंबंधी एका करारावरही स्वाक्षरी केली. या कराराअंतर्गत बोत्सवानाच्या नागरिकांना उत्तम दर्जाची आणि परवडणाऱ्या दरातील भारतीय औषधे सहजतेने उपलब्ध होऊ शकणार आहेत. बोत्सवानाने केलेल्या विनंतीनुसार, भारताकडून त्यांना अत्यावश्यक एआरव्ही औषधे पुरवली जातील अशी घोषणाही राष्ट्रपतींनी भारताच्या वतीने केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule