

रायगड, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। खांदाड गावात गेल्या तीन वर्षांपासून मगरींच्या वावरामुळे ग्रामस्थ भयभीत वातावरणात राहत होते. अखेर मंगळवारी रात्री गावातील धाडसी तरुणांनी एक मगर जिवंत पकडून ग्रामस्थांना दिलासा दिला. या घटनेने गावात पुन्हा एकदा वनविभागाच्या निष्क्रियतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
गेल्या काही वर्षांत गावाच्या ओढ्याजवळ वारंवार मगरींचे दर्शन होत होते. कोंबड्या, पाळीव प्राणी आणि पक्ष्यांवर मगरींचे हल्लेही वाढले होते. ग्रामस्थांनी वेळोवेळी वनविभागाला कळवूनही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. माणगाव नगरपंचायतीचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी देखील वारंवार कारवाईची मागणी केली होती, पण केवळ “सावधान – मगरींचा परिसर” अशा फलकांपुरतेच काम थांबले.
भीमसेन वलेराव यांच्या घरासमोर ११ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ८.१० वाजता मगर दिसल्याची बातमी पसरताच गावातील तरुणांनी धाव घेतली. महेश पोवार (बाळा डी.जे.) यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी कोणतीही इजा न करता मगरीला कौशल्याने पकडले. युवक निखिल वले यांनी तात्काळ वनअधिकारी प्रशांत शिंदे यांना माहिती दिली. काही वेळानंतर वनपथक घटनास्थळी पोहोचले, मात्र आवश्यक उपकरणांच्या अभावामुळे तणाव निर्माण झाला. शेवटी गावकऱ्यांनी पकडलेली मगर वनपथकाकडे सुपूर्द करण्यात आली.ग्रामस्थांची मागणी आहे की ही मगर दूरच्या समुद्रवाहिनी परिसरात सोडण्यात यावी, जेणेकरून ती पुन्हा गावात परतू नये. वनविभागाच्या कारवाईतील विलंबावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “भविष्यात कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके