
ठाणे, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। रुग्णालय ही फक्त इमारत एक नसते, ती मानवतेची सेवा आणि करुणेचा पाया असते. ठाण्याचे हे नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय येणाऱ्या पिढ्यांसाठी आशेचा किरण ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज येथे केले.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामस्थळास भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी मुख्य रुग्णालय इमारतीमधील बाहयरुग्ण विभाग, अपघात विभाग, एमआरआय विभाग, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, क्ष-किरण, मॅमोग्राफी, आंतररुग्ण विभाग, प्रसूती विभाग, मॉडयुलर शस्त्रक्रियागृह तसेच हेलीपॅड तसेच वाहनतळ इमारत व परिचारीका प्रशिक्षण केंद्र व वसतीगृह आणि वसतीगृह इमारतीची पाहणी केली.
या बांधकामाचे क्षेत्रफळ हे 92 हजार 539.00 चौ.मी. असून आरोग्य मंत्री श्री.आबिटकर यांनी पाहणी दरम्यान नवीन रुग्णालयाचे बांधकाम 87 टक्के पूर्ण झालेले पाहून समाधान व्यक्त केले. या रुग्णालयात 900 खाटांची क्षमता असून त्यात 500 खाटांचे सामान्य रुग्णालय, 200 खाटांचे महिला-बाल रुग्णालय आणि 200 खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय तसेच हेलिपॅड, परिचारिका प्रशिक्षण केंद्र, वसतिगृह, पार्किंग आणि अत्याधुनिक ICU सुविधा उपलब्ध असणार आहेत.
या रुग्णालयामध्ये मातामृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी आधुनिक आय. सी. यू. व नवजात बालकांसाठी आधुनिक एन.आय.सी.यू. व एसएनसीयू व इतर गरजू रुग्णांकरिता टीसीयू, आयसीयू, एनआरसी, मानसरोग, रक्तविकार व रुग्णालयीन इतर आवश्यक सुविधांबरोबर सुपर स्पेशालिटी 200 खाटांच्या रुग्णालयामध्ये हृदयविकाराच्या रुग्णांकरिता कॅथलॅब, न्यूरोलॉजी तसेच ऑनकोलॉजी व ऑनकॉसर्जरी विभाग, नेफ्रोलॉजी व डायलेसिस विभाग कार्यान्वित असणार आहेत. बालकांसाठी देखील डायलेसिसची सुविधा येथील रुग्णालयामध्ये उपलब्ध असणार आहे. सोबतच एमआरआय, सी.टी. स्कॅन व केमोथेरपी रेडिएशन थेरपी सारख्या अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे.
नवीन रुग्णालयामध्ये एएनएम/जीएनएम सोबत बीएससी नर्सिंग कॉलेज सुरु करणे तसेच भविष्यात मेडिकल कॉलेज सुरु करण्याबाबत आश्वासन दिले आहे. ठाणे जिल्हा रुग्णालय हे महाराष्ट्रतील आरोग्य सेवेचे सर्वात मोठे रुग्णालय होणार आहे. तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये 6 महानगरपालिका, 2 नगरपरिषद व 2 नगरपंचायत महानगर हद्दीतील लोकांबरोबरच दुर्गम भागातील टोकावडे, मुरबाड, शहापूर तालुका व ग्रामीण व शहरी भाग व ठाणे जिल्ह्यातील तसेच लगतच्या पालघर, रायगड जिल्ह्यातील गुजरात सीमेपासून ते कसारा घाट, माळशेज घाट ते लोणावळा घाटापर्यंत गरजू रुग्णाला अत्याधुनिक सेवा सुविधांचा गरजू रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
सद्य:स्थितीत ठाणे जिल्हा हा मुंबई शहर व उपनगर लगतचा जिल्हा आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग, मुंबई-आग्रा महामार्ग, मुंबई-अहमदनगर महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग असून विरार-अलिबाग महामार्ग व मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाचे काम सुरु आहे. तसेच लोहमार्गाचे जाळे पसरलेले आहेत. तरी महामार्गावरील अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार देण्याकरिता ठाणे जिल्हा रुग्णालय येथे व मुंबईकडे संदर्भित करावे लागते. हे रुग्णालय कार्यान्वित झाल्यानंतर सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयात उपलब्ध होवून ठाणे जिल्हा व लगतच्या सर्व जिल्ह्यातील रुग्णांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार असल्याने जनतेला आरोग्य सेवांच्या उन्नतीबाबत शासनाच्या बांधिलकीचे द्योतक असून नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील, याबाबत आरोग्य मंत्री श्री.आबिटकर यांनी समाधान व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर