
मुंबई, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या बाजारपेठेत मागे राहिलेल्या यामाहाने अखेर आपली एन्ट्री नोंदवली आहे. कंपनीनं आपल्या लोकप्रिय एरॉक्स 155 मॅक्सी-स्कूटरचं इलेक्ट्रिक व्हर्जन यामाहा एरॉक्स इलेक्ट्रिक (एरॉक्स-इ) सादर केलं आहे. या स्कूटरची किंमत २०२६ मध्ये जाहीर होणार असली तरी तिची रेंज आणि वैशिष्ट्यं कंपनीनं आधीच उघड केली आहेत.
नवीन एरॉक्स इलेक्ट्रिकचं डिझाइन पेट्रोल मॉडेलसारखंच असून ती पूर्णपणे इलेक्ट्रिक मोटरवर चालते. कंपनीनं तिची प्रमाणित रेंज १०६ किलोमीटर असल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे ती शहरातील दैनंदिन प्रवासासाठी एक आकर्षक पर्याय ठरते.
या स्कूटरमध्ये ९.४ किलोवॅट मोटर असून ती ४८ Nm पीक टॉर्क निर्माण करते. यासोबतच स्मार्ट की सिस्टीम, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि ५-इंच TFT डिजिटल स्क्रीन अशी आधुनिक वैशिष्ट्यं देण्यात आली आहेत.
३ kWh क्षमतेचा ड्युअल बॅटरी पॅक या स्कूटरमध्ये बसवण्यात आला आहे. ही बॅटरी काढता येणारी असल्याने घरीही सहज चार्ज करता येते. एक बॅटरी सुमारे ३ तास १० मिनिटांत पूर्ण चार्ज होते.
एरॉक्स-इ मध्ये इको, स्टँडर्ड आणि पॉवर असे तीन राइड मोड दिले असून, अतिरिक्त वेगासाठी ‘बूस्ट फंक्शन’ देखील आहे. या मोडमध्ये स्कूटर १०० किमी प्रतितास इतका वेग गाठते. रिव्हर्स मोडची सुविधाही देण्यात आली आहे.
यामाहा कंपनीनं स्पष्ट केलं आहे की ती इतर ब्रँड्सप्रमाणे सर्व्हिसच्या बाबतीत दुर्लक्ष करणार नाही. विक्रीपूर्वी देशभरातील मेकॅनिकना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे, जेणेकरून ग्राहकांना विश्वासार्ह सर्व्हिस अनुभव मिळेल. ओला आणि बजाज चेतकसारख्या कंपन्यांनी सर्व्हिस नेटवर्कमुळे ग्राहकांना आलेल्या अडचणींपासून धडा घेत यामाहा ही स्कूटर पूर्ण तयारीनिशी बाजारात आणणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule